ताप आणि वेदना कमी करणाऱ्या 'निमुसलाईड'वर बंदी का घालण्यात आली? काय आहे कारण ज्यामुळे जीवाला धोका!
Central government bans nimesulide : केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ताप आणि वेदना कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या 'निमेसुलाइड' या औषधाच्या १०० मिलीग्रामपेक्षा जास्त क्षमतेच्या सर्व ओरल फॉरम्युलेशनच्या (गोळ्या आणि सिरप) उत्पादन, विक्री आणि वितरणावर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. निमेसुलाईड या औषधीचे शंभर मिलीपेक्षा जास्त प्रमाण असेल तर त्याचे आरोग्यावर अनिष्ट परिणामाची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

'निमुसलाईड'वर बंदी का घालण्यात आली?
आरोग्य मंत्रालयाने 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, १९४०' च्या कलम २६ अ अंतर्गत ही कारवाई केली आहे. या निर्णयामागील काही प्रमुख कारणे आहेत.
यकृताला धोका : वैद्यकीय संशोधनानुसार, निमेसुलाइडचा उच्च डोस यकृताला गंभीर इजा पोहोचवू शकतो, जे काही प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरू शकते.
किडनीवर परिणाम : या औषधामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
सुरक्षित पर्याय उपलब्ध : निमेसुलाइडपेक्षा अधिक सुरक्षित आणि प्रभावी वेदनाशामक औषधे बाजारात उपलब्ध असल्याने सरकारने हा धोकादायक पर्याय हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक बंदी : अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जपान आणि ऑस्ट्रेलियासह अनेक विकसित देशांमध्ये या औषधावर आधीच बंदी आहे.
प्राण्यांच्या औषधांवर यापूर्वीच बंदी
विशेष म्हणजे, जानेवारी २०२५ मध्येच केंद्र सरकारने पशुवैद्यकीय औषधांमध्ये निमेसुलाइड वापरण्यास बंदी घातली होती. ज्या गायींना हे औषध दिले जायचे, त्यांचे मांस खाल्यामुळे गिधाडांचा मृत्यू होत असल्याचे आढळल्याने पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
नागरिकांसाठी सूचना
- तुमच्या औषधाच्या पाकिटावर 'Nimesulide' नाव तपासा आणि ते १०० मिलीग्रामपेक्षा जास्त असेल तर त्याचा वापर टाळा.
- कोणतेही वेदनाशामक औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
- फार्मा कंपन्यांना आता प्रतिबंधित डोसचा साठा बाजारातून मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कफ सिरप विक्रीचे कायदेशीर निकष
केंद्र सरकारच्या 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट'नुसार, ज्या कफ सिरपमध्ये कोडाईन किंवा तत्सम उच्च क्षमतेच्या अंमली द्रव्यांचा समावेश असतो, अशा औषधांची गणना 'शेड्यूल H1' श्रेणीत केली जाते. या नियमानुसार अशा प्रकारच्या कफ सिरपची खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचे अधिकृत प्रिस्क्रिप्शन सादर करणे कायदेशीररीत्या अनिवार्य आहे.
कोणत्याही फार्मसी किंवा मेडिकल स्टोअर चालकाने डॉक्टरांच्या लेखी चिठ्ठीशिवाय या औषधांची विक्री करणे बेकायदेशीर असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित औषध विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications