धर्मेद्र यांच्या 450 कोटींच्या संपत्तीचा वारस कोण? हेमामालिनीला वाटा मिळेल की नाही? काय सांगतो कायदा
Dharmendra net worth 450 crore Property Distribution : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या मागे असलेल्या ४५० कोटी रुपयांच्या प्रचंड संपत्तीचे वाटप कसे होणार? दोन विवाहांमधून जन्माला आलेल्या त्यांच्या सहा मुलांना कायद्यानुसार समान हक्क मिळणार का? दुसरी पत्नी हेमामालिनी यांना संपत्तीत वाटा मिळू शकेल का, याबाबत कायदा काय सांगतो याबाबत आता चर्चा होत आहे.
बॉलीवूडचे 'ही-मॅन' अर्थात धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी ८९ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या ४५० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या कायदेशीर वारसदारांविषयी उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे संपत्ती हक्कांसंबंधीच्या या महत्त्वपूर्ण विषयावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय काय आहे हे जाणून घेऊया.

धर्मेंद्र यांची संपत्ती आणि वारसदार
एकूण संपत्ती: सुमारे ४५० कोटी रुपये. (यात मुंबईतील आलिशान बंगला, लोणावळा आणि खंडाळा येथील फार्महाऊसेस, तसेच लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.)
दोन विवाह, सहा मुलं
धर्मेंद्र यांचा पहिला विवाह प्रकाश कौर यांच्याशी केला, जो कायदेशीररित्या वैध आहे. दुसरा विवाह त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी केला. प्रकाश कौर (पहिली पत्नी) यांना सनी देओल, बॉबी देओल, अजिता देओल आणि विजेता देओल ही चार मुलं तर दुसरी पत्नी हेमा मालिनी यांना ईशा देओल आणि आहना देओल या मुली आहेत.
दुसऱ्या विवाहांतील मुलांना मिळणार समान हक्क
वनइंडियाच्या वृत्तानुसार, धर्मेंद्र यांचा पहिला विवाह कायदेशीररित्या कायम असल्याने, हिंदू विवाह कायदा (HMA) नुसार त्यांचा दुसरा विवाह 'अवैध मानला जातो. मात्र, अशा विवाहांमधून जन्मलेल्या मुलांच्या संपत्तीवरील हक्कांवर कायद्याने स्पष्टता दिली आहे.
सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
२०२३ मध्ये 'रेवनसिद्दप्पा विरुद्ध मल्लिकार्जुन' (2023 INSC 783) या खटल्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, जरी विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार अवैध ठरला असला, तरी त्या विवाहातून जन्माला आलेली मुले कायदेशीररित्या 'वैध' मानली जातील.
समान वारसा हक्क
हिंदू विवाह कायद्याच्या कलम १६(१) नुसार, अशा मुलांना त्यांच्या वडिलांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर समान हक्क मिळेल. हा हक्क फक्त आई-वडिलांच्या संपत्तीपुरता मर्यादित असेल, संयुक्त कुटुंब किंवा वडिलोपार्जित संपत्तीवर तो लागू होणार नाही.
विधीज्ञ कमलेश कुमार मिश्रा यांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर जेव्हा मालमत्तेचे वाटप होईल, तेव्हा एक काल्पनिक विभाजन गृहीत धरले जाईल. म्हणजे, मृत्यूपूर्वी वडिलोपार्जित मालमत्तेचे विभाजन झाले असते आणि त्यात धर्मेंद्र यांचा जो हिस्सा आला असता, तो त्यांच्या कायदेशीर वारसदारांमध्ये समान वाटला जाईल.
धर्मेंद्र यांच्या संपत्तीचे कायदेशीर वारसदार
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, धर्मेंद्र यांच्या स्वकष्टार्जित संपत्तीमध्ये खालील व्यक्तींना समान हिस्सा मिळेल..
- प्रकाश कौर (पहिली पत्नी)
- सनी देओल (पहिले पुत्र)
- बॉबी देओल (दुसरा पुत्र)
- अजिता देओल (पहिली कन्या)
- विजेता देओल (दुसरी कन्या)
- ईशा देओल (दुसऱ्या विवाहातील कन्या)
- आहना देओल (दुसऱ्या विवाहातील कन्या)
हेमा मालिनी यांना हिस्सा मिळणार का?
हिंदू विवाह, कायदेशीररित्या, हेमा मालिनी यांचा विवाह अवैध ठरत असल्याने त्यांना धर्मेंद्र यांच्या संपत्तीत थेट हिस्सा मिळणार नाही. त्यांना हिस्सा केवळ तेव्हाच मिळू शकतो, जेव्हा धर्मेंद्र यांनी आपल्या मृत्यूपत्रात त्यांचा समावेश केला असेल किंवा त्यांची कोर्टात विवाहाची वैधता सिद्ध झाल्यास. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या २०२३ च्या या निर्णयामुळे, दुसऱ्या विवाहातील मुलांना वडिलांच्या संपत्तीत केवळ नावाचा नव्हे, तर कायदेशीर आणि समान हक्क प्राप्त झाला आहे, हे स्पष्ट होते.












Click it and Unblock the Notifications