‘अशी ही बनवाबनवी'तील ‘७० रुपये वारले' हा संवाद कोणी लिहिला? सचिन पिळगांवकरांनी सांगितला किस्सा...
मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर हास्यपटांमध्ये गणल्या जाणाऱ्या 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. या चित्रपटाच्या यशामागे केवळ अभिनयच नाही तर संवादलेखनाच्या पातळीवरही मेहनतीचा मोठा वाटा आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे आणि मराठी सिनेमाचे महत्त्वाचे कलाकार असलेले सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाच्या लेखनात स्वतःचा मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं आहे.

"बहुतेक संवाद आधीच लिहिले होते" सचिन पिळगांवकर
सचिन पिळगांवकरांनी सांगितले की, "'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाचे बहुतांश संवाद हे मी आणि लेखक वसंत सबनीस यांनी आधीच लिहून ठेवले होते. सेटवर फक्त दोन तीन संवादच तिथेच सुचून म्हणण्यात आले." "'धनंजय माने इथेच राहतात का?', हा प्रसिद्ध संवाद मी ठरवून स्क्रिप्टमध्ये लिहिला होता आणि त्याचं म्हणणे कसं हवं हेही मी वसंत सबनीसांना दाखवून दिलं होतं," असंही ते म्हणाले.
प्रसिद्ध विनोदी संवाद कुणी सुचवले?
चित्रपटातील काही ठराविक संवाद हे कलाकारांनी अभिनय करताना सुचवले होते. यामध्ये "हा माझा बायको पार्वती" - अशोक सराफचा, "सारखं सारखं काय त्याच झाडावर" -सचिन पिळगांवकरचा, आणि "जाऊबाई... नका ओ जाऊ..." - लक्ष्मीकांत बेर्डेचा समावेश आहे. मात्र, बाकी सर्व संवाद हे आधीच स्क्रिप्टमध्ये होते, असं सचिन पिळगांवकर स्पष्ट करतात.
त्रिकुटाची घट्ट मैत्री आणि सिनेमामागचं नातं
सचिन पिळगांवकर म्हणाले, "मी, लक्ष्मीकांत (लक्ष्या) आणि अशोक यांचं नातं 'अशी ही बनवाबनवी'च्या वेळी अधिक घट्ट झालं. चित्रपटाच्या वेळी आम्ही नियमित भेटायचो - कधी माझ्या घरी, कधी अशोकच्या. या स्नेहाचा प्रभाव आमच्या कामातही दिसून यायचा. लक्ष्या सुरुवातीला आमच्याशी तितका मोकळा नव्हता, पण या चित्रपटाने त्याला जवळ आणलं."
लक्ष्या अजूनही आठवतो...
मुलाखतीच्या शेवटी, लक्ष्मीकांत बेर्डेबाबत भावनिक आठवणी शेअर करताना सचिन म्हणाले, "'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटात मला त्याला घेण्याची इच्छा होती. पण आरोग्याच्या अडचणींमुळे तो म्हणाला, 'मला डॉक्टरांनी परवानगी दिली नाही'. आणि दुर्दैवाने तो डिसेंबर 2004 मध्येच आपल्यातून निघून गेला. त्याची उणीव मला केवळ सिनेमात नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही सतत जाणवत असते."
चित्रपटात हास्यविष्कार करणारे कलाकार
'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सुशांत रे यांनी अप्रतिम विनोद निर्माण केला होता. सोबतच निवेदिता जोशी, अश्विनी भावे आणि सुप्रिया पिळगांवकर यांसारख्या अभिनेत्रींचा अभिनयही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.












Click it and Unblock the Notifications