UPI पेमेंटमध्ये मोठा बदल, चुकूनही चुकीच्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर होणार नाहीत
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने यूपीआय (UPI) व्यवहारांमध्ये सुरक्षितता आणि पारदर्शकता आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवीन अपडेटनुसार 30 जून 2025 पासून सर्व यूपीआय अॅप्सना व्यवहारादरम्यान फक्त कोअर बँकिंग सिस्टम (CBS) मधून पडताळलेले लाभार्थींचे नावच दर्शवावे लागेल, अशी सक्तीची तरतूद करण्यात आली आहे. हे मोठं पाऊल यूपीआय फसवणूक रोखण्यासाठी आणि चुकीच्या पेमेंट्स टाळण्यासाठी उचलण्यात आलं आहे.
नवीन नियम
एनपीसीआयने 24 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात यूपीआय अॅप्सना पीयर-टू-पीयर (P2P) आणि पीयर-टू-मर्चंट (P2M) व्यवहारांमध्ये फक्त सीबीएसमधील पडताळलेले लाभार्थींचे नाव दर्शवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी, यूपीआय व्यवहारांमध्ये क्वीआर कोड्स, संपर्क यादी, किंवा यूजरने ठरवलेले नाव यांचा वापर होत होता, ज्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना चुकीचे नाव दाखवून पैसे हडपण्याची संधी मिळत होती. या नव्या नियमाने अशा गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार "हा बदल वापरकर्त्यांना त्यांना पैसे पाठवत असलेल्या लाभार्थ्याची खात्री करण्यास आणि चुकीच्या पेमेंट्सचा धोका कमी करण्यास मदत करेल." गेल्या काही वर्षांत यूपीआय फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये फसवणूक करणारे लोक बनावट खाती किंवा चुकीचे नाव वापरून पैसे हस्तांतरित करत होते. या नियमाच्या अंमलबजावणीने अशा प्रकारच्या घोटाळ्यांना रोखण्यात मदत होणार आहे.
नवीन नियमांचे तपशील
नव्या नियमांनुसार, यूपीआय अॅप्सना व्यवहाराच्या पुष्टीकरणाच्या स्क्रीनवर आणि व्यवहारात फक्त बँकेत नोंदवलेले नाव दाखवावे लागेल. यासाठी, अॅप्सना वैलिडेट अॅड्रेस एपीआयचा वापर करावा लागेल, जो बँक नोंदणीकृत नाव मिळवण्यासाठी वापरला जातो. क्वीआर कोड्स किंवा संपर्क यादीतील नावे आता दर्शवली जाणार नाहीत. हा नियम 30 जून 2025 पर्यंत पूर्णपणे लागू होईल, आणि त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल.
एनपीसीआयने सर्व यूपीआय सदस्य बँक, अॅप्स, आणि थर्ड पार्ट अॅपला या बदलांसाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. बँकांना आपल्या ग्राहकांना या बदलांबाबत माहिती देणे आणि त्यांच्या खात्यांमधील माहिती अपडेट करणे आवश्यक आहे. विशेषतः, ज्या वापरकर्त्यांचे मोबाइल नंबर दीर्घकाळापासून निष्क्रिय आहेत त्यांनी त्वरित त्यांच्या बँकेत संपर्क करून माहिती अपडेट करावे, अन्यथा त्यांचे यूपीआय व्यवहार प्रभावित होऊ शकतात.












Click it and Unblock the Notifications