एका क्लिक अन् खातं होत रिकामं! डिजिटल पेमेंट सुरक्षित ठेवण्यासाठी NPCIने दिल्या खास टिप्स!
NPCI has given special tips to keep digital payments safe : डिजिटल पेमेंटने मानवी जीवनात बदल घडून आलाय, UPI आणि मोबाईल वॉलेटमुळे रोख रकमेचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तर एका क्लिकवर होणारे हे व्यवहार अत्यंत जलद, सोयीस्कर आणि सोपे झालेत, परंतु, हे खरंच ते पूर्णपणे सुरक्षित आहेत का?, हा एक महत्त्वाचा विषय आहे.
कारण, या डिजिटल क्रांतीसोबतच डिजिटल पेमेंट फसवणुकीचा धोकाही वाढला आहे. याच धोक्यापासून वाचण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने महत्त्वाच्या पाच टिप्स दिल्या आहेत, ज्या तुम्हाला दररोज होणाऱ्या फसवणुकीपासून वाचवू शकतात.

पेमेंट करण्यापूर्वी पडताळणी करा
तुम्ही कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवण्यापूर्वी, त्या व्यक्तीचे नाव आणि इतर तपशील पूर्णपणे तपासा. फसवणूक करणारे अनेकदा चुकीची माहिती देऊन तुम्हाला गोंधळात पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे, पेमेंट करण्यापूर्वी, आपण योग्य व्यक्तीलाच पैसे पाठवत आहोत याची खात्री करून घ्या. ही एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते.
विश्वसनीय ॲप्स आणि वेबसाइट्स वापरा
नेहमी अधिकृत आणि विश्वसनीय पेमेंट ॲप्स किंवा वेबसाइट्सचाच वापर करा. संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे किंवा अज्ञात ॲप्स डाउनलोड करणे टाळा. फसवणूक करणारे अनेकदा स्वतःला सरकारी अधिकारी, पोलीस किंवा बँक कर्मचारी म्हणून सादर करतात आणि तुम्हाला खोटी माहिती देऊन तुमची गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही अनोळखी लिंकवरून येणारे ॲप्स त्वरित डाउनलोड करू नका.
कधीही पासवर्ड शेअर करू नका
तुमचा UPI पिन, OTP (वन टाइम पासवर्ड), बँक पासवर्ड किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था तुम्हाला फोन, ईमेल किंवा मेसेजद्वारे तुमची गोपनीय माहिती विचारत नाही. जर कोणी अशी माहिती मागत असेल, तर समजून घ्या की ती व्यक्ती फसवणूक करणारी आहे.
एसएमएस आणि सूचना चालू ठेवा
प्रत्येक व्यवहारासाठी तुमच्या फोनवर येणारे SMS आणि ॲप सूचना चालू ठेवा. यामुळे तुमच्या बँक खात्यातून होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची तुम्हाला त्वरित माहिती मिळेल. जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद पेमेंट रिक्वेस्ट आली आणि त्यावर लगेच पैसे देण्याचा दबाव येत असेल, तर लगेच पैसे देऊ नका. आधी त्या रिक्वेस्टची खात्री करा, ती खरी आहे की नाही हे तपासा आणि मगच पेमेंट करा.
घाईघाईत पेमेंट करू नका
फसवणूक करणारे अनेकदा तुम्हाला जलद निर्णय घेण्यासाठी आणि तातडीने पेमेंट करण्यासाठी दबाव टाकतात. अशा परिस्थितीत, घाईघाईत कोणताही व्यवहार करू नका. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा, परिस्थिती समजून घ्या आणि मगच पेमेंट करा. तुमची एक चूक तुम्हाला मोठ्या नुकसानीत टाकू शकते.
शेकडो लोकांना दररोज बसतोय फटका!
डिजिटल पेमेंटचे फायदे जसे आहेत, तसेच धोकेही आहेत. 2024 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एका वर्षात 208.5 अब्ज डिजिटल पेमेंट व्यवहार झाले, म्हणजेच दिवसाला 571 दशलक्ष व्यवहार.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात १ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या डिजिटल पेमेंट आणि कार्ड फसवणुकीची २९,०८२ प्रकरणे नोंदवण्यात आली. या आकडेवारीनुसार, दररोज सरासरी ८०० पेक्षा जास्त लोक डिजिटल फसवणुकीला बळी पडत आहेत.












Click it and Unblock the Notifications