EPFO खातेदारांसाठी आनंदाची बातमी! 2024-25 साठी 8.25% व्याज जमा, कोट्यवधींना लाभ
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) नोंदणीकृत असलेल्या कोट्यवधी खातेदारांच्या खात्यांमध्ये आर्थिक वर्ष 2024-25 साठी 8.25% दराने व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, येत्या आठवड्यात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

33.56 कोटी सदस्य खात्यांना थेट लाभ
EPFO मार्फत दरवर्षी सर्व खातेदारांच्या खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा केली जाते. यंदाच्या वर्षासाठी केंद्र सरकारने 22 मे 2025 रोजी 8.25% व्याजदरास मंजुरी दिली होती. त्यानंतर 6 जूनपासून व्याज जमा करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. आतापर्यंत 13.86 लाख नियोक्त्यांमार्फत 32.39 कोटी सदस्य खात्यांमध्ये व्याज जमा करण्यात आले आहे. ही आकडेवारी 8 जुलै 2025 पर्यंतची आहे.
EPFO च्या माहितीनुसार, एकूण 13.88 लाख नियोक्त्यांचे आणि 33.56 कोटी सदस्यांचे वार्षिक खाती अद्यतनित करण्यात आले आहेत. यातील 99.9% नियोक्त्यांची आणि 96.51% सदस्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित खात्यांमध्ये येत्या 8 दिवसांत व्याज जमा करण्यात येईल, असे श्रममंत्री मांडवीय यांनी सांगितले.
पूर्वीच्या तुलनेत यंदाचा व्याजदर अधिक
आर्थिक वर्ष 2021-22: 8.10%
आर्थिक वर्ष 2022-23: 8.15%
आर्थिक वर्ष 2023-24: 8.25%
2023-24 मध्ये 0.10% ची वाढ करण्यात आली होती, आणि तीच पातळी 2024-25 साठी कायम ठेवण्यात आली आहे.
ऑप्टिमायझेशनमुळे प्रक्रिया वेगाने
मांडवीय यांनी सांगितले की, मागील आर्थिक वर्षात ही प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरु झाली होती आणि डिसेंबरमध्ये पूर्ण झाली होती. मात्र, यावर्षी सिस्टममध्ये करण्यात आलेल्या ऑप्टिमायझेशनमुळे व्याजवाटपाचे काम जून महिन्यातच प्रगतीपथावर आले. त्यामुळे यावर्षी ही प्रक्रिया अधिक जलद गतीने पार पडत आहे.
EPFO बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक
EPFO च्या केंद्रीय बोर्डाची 237 वी बैठक 28 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीत पार पडली होती. या बैठकीत 2024-25 साठी 8.25% व्याजदराची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर वित्त मंत्रालयानेही ही शिफारस मान्य केली.
EPFO कडून आर्थिक वर्ष 2024-25 साठी 8.25% दराने व्याजवाटप सुरू असून, देशभरातील कोट्यवधी कर्मचारी आणि खातेदार यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याने EPFO सदस्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.












Click it and Unblock the Notifications