ICICI आणि अन्य प्रमुख बँका, कार्ड नेटवर्क्स एअरपोर्ट लाऊंज अॅग्रीगेटरपासून दूर का जात आहेत?
ICICI बँक, अॅक्सिस बँक आणि मास्टरकार्ड यांसारख्या भारतातील प्रमुख बँका आणि कार्ड नेटवर्क्स आता ड्रीमफोक्स सर्व्हिसेस लिमिटेडपासून (DreamFolks Services Ltd) दुरावत आहेत. लवकरच त्या थेट विमानतळ लाऊंज ऑपरेटर्सशी भागीदारी करण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. इतरही अनेक बँका लवकरच हेच पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

ड्रीमफोक्स ही एक ग्लोबल ट्रॅव्हल व लाइफस्टाइल सर्व्हिसेस अॅग्रीगेटर कंपनी आहे, जी देशभरातील विमानतळांवर लाऊंज अॅक्सेस सेवा देते. गेल्या वर्षी 22 सप्टेंबर रोजी ड्रीमफोक्सच्या सेवेत एक तात्पुरती अडचण निर्माण झाली होती, ज्यामुळे हजारो प्रवाशांना लाऊंजमध्ये प्रवेश करण्यात अडथळा आला. ही समस्या दुसऱ्या दिवशीच दूर झाली, तरीही त्यानंतर अनेक बँका व कार्ड नेटवर्क्सने पर्यायी सेवा पुरवठादारांचा विचार सुरू केला.
अॅक्सिस बँक, ICICI बँक आणि मास्टरकार्ड या बाबतीत आघाडीवर आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. अजूनही बँका या पावलावर विचार करत आहेत. अॅक्सिस बँकेने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ICICI बँक व मास्टरकार्ड यांना पाठवलेल्या ईमेल्सना अद्याप उत्तर मिळालेले नाही. ड्रीमफोक्सकडूनही त्यांच्या इन्व्हेस्टर रिलेशन किंवा अधिकृत ईमेलवर काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
ड्रीमफोक्सचा दावा आहे की भारतातील देशांतर्गत लाऊंज अॅक्सेस मार्केटमध्ये ते सुमारे 90 टक्के मार्केट शेअर नियंत्रित करतात. तथापि, सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अडथळ्यामुळे एकाच वेळी 34 विमानतळांवर 49 लाऊंज सेवा बंद करण्यात आल्या, ज्यामुळे देशभरातील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
कोलकाता व चेन्नई विमानतळांवर लाऊंज चालवणाऱ्या ट्रॅव्हल फूड अँड सर्व्हिसेस (TFS) या कंपनीने ड्रीमफोक्सविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता, अशी माहिती समोर आली होती.
अदानी ग्रुप, जो देशातील सात प्रमुख विमानतळ चालवतो, त्याने एका निवेदनात म्हटलं होतं की, "DreamFolks Services Ltd ने बँकांसोबत असलेल्या भागीदारीचे उल्लंघन करून सेवा तातडीने थांबवली, त्यामुळे संपूर्ण भारतातील प्रवाशांना लाऊंज अॅक्सेसमध्ये अडचणी येत आहेत."
GMR, अदानी आणि TFS हे तिघे मिळून एकत्रितपणे विमानतळ लाऊंजमधून येणाऱ्या 80-85% प्रवासी वाहतुकीचे व्यवस्थापन करतात. सध्या ड्रीमफोक्स हे तृतीय-पक्ष अॅग्रीगेटर म्हणून काम करत आहे.
ड्रीमफोक्सने 22 सप्टेंबरच्या निवेदनात म्हटलं होतं की, ही "तात्पुरती सेवा अडचण" आहे आणि सर्व करार अजूनही "पूर्णपणे वैध" आहेत. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी एक अपडेट दिलं की, "Adani Airports मध्ये आमच्या टीमने तांत्रिक समस्येचं निराकरण केलं आहे. आता सर्व पात्र कार्डधारकांना पुन्हा एकदा लाऊंजमध्ये प्रवेश दिला जाईल."
ड्रीमफोक्सने पुढे सांगितले की, "आमच्या टीमने सखोल विश्लेषण आणि तांत्रिक उपाययोजना करून एक स्थिर व विश्वसनीय सोल्यूशन दिलं आहे. त्यामुळे आता क्रेडिट, डेबिट आणि मेंबरशिप कार्ड्सचा स्वीकार सर्व लाऊंजमध्ये सुरळीतपणे होईल."
या तांत्रिक अडचणीनंतर, अमेरिकन एक्सप्रेससारख्या काही बँकांनी अदानी डिजिटलसोबत थेट भागीदारी करण्यास सुरुवात केली आहे, असं सूत्रांनी स्पष्ट केलं. या घटनाक्रमानंतर बँका व लाऊंज ऑपरेटर्स थेट संवाद साधून, कोणत्याही तृतीय-पक्ष अॅग्रीगेटरशिवाय सेवा देण्याच्या दिशेने काम करत आहेत.
ड्रीमफोक्सची स्थापना 2013 मध्ये झाली होती. ही कंपनी भारतातील आघाडीची विमानतळ सेवा अॅग्रीगेटर असून, बँका, कार्ड नेटवर्क्स आणि विमान कंपन्यांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. कंपनीच्या एकूण महसूल व नफ्याचा मोठा हिस्सा लाऊंज सेवा पुरवण्यामधून येतो.
आर्थिक वर्ष 2025 साठी, ड्रीमफोक्सने 14 टक्क्यांनी वाढलेला महसूल 1,292 कोटी इतका जाहीर केला. मात्र, त्यांचा निव्वळ नफा 5 टक्क्यांनी घसरून 65 कोटींवर पोहोचला. याच वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने जाहीर केलं होतं की, ते लाऊंज शिवाय इतर सेवा क्षेत्रांतूनही महसूल वाढवण्यावर भर देणार आहेत. कंपनी विमानतळांवर फक्त लाऊंजच नव्हे तर फूड अँड बेव्हरेजेस, स्पा व वेलनेस, मीट अँड असिस्ट आणि एअरपोर्ट ट्रान्सफर सारख्या सेवा पुरवते.












Click it and Unblock the Notifications