8th Pay Commission: केंद्र कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 8वा वेतन लागू होताच इतका वाढेल पगार, आली अपडेट
8th Pay Commission Latest Update News : केंद्रातील कोट्यवधी सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे.
पगार अन् पेन्शनमध्ये किती होणार वाढ?
'द इकॉनॉमिक टाईम्स'च्या अहवालानुसार, या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० ते ३४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. ब्रोकरेज फर्म अँबिट कॅपिटलने त्यांच्या अहवालात दावा केलाय की, पगार आणि पेन्शनमध्ये ३०-३४% वाढ होऊ शकते, ज्यामुळे सुमारे १.१ कोटी लोकांना फायदा होईल.
नवीन वेतनश्रेणी जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची अपेक्षा आहे, परंतु यासाठी प्रथम वेतन आयोगाचा अहवाल तयार करावा लागेल, नंतर तो सरकारला पाठवावा लागेल आणि मंजूर करावा लागेल. आतापर्यंत फक्त घोषणा झाली आहे. आयोगाचे अध्यक्ष कोण असतील आणि त्यांचा कार्यकाळ किती असेल?, याबाबत निर्णय झालेला नाही.

आठव्या वेतन आयोगाचा नेमका लाभ कोणाला मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १.१ कोटी लोकांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ घेता येणार आहे. ज्यामध्ये सुमारे ४४ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे ६८ लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन, भत्ते आणि निवृत्ती लाभांमध्ये वाढ होईल.
काय असते फिटमेंट फॅक्टर?
नवीन पगार ठरवण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे फिटमेंट फॅक्टर, हा नवीन पगार ठरवण्यासाठी विद्यमान मूळ पगाराचा गुणाकार करण्यासाठी वापरला जाणारा आकडा आहे. उदाहरण - सातव्या वेतन आयोगाने २.५७ चा घटक वापरला. त्यावेळी त्यांनी किमान मूळ पगार ७,००० रुपयांवरून १८,००० रुपये प्रति महिना वाढवला होता. अहवालात म्हटले आहे की यावेळी फिटमेंट फॅक्टर १.८३ ते २.४६ दरम्यान असू शकतो. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना किती वाढ मिळेल याची अचूक माहिती आकडा निश्चित झाल्यावरच कळणार आहे.
भारतात पगारवाढीचा नेमका इतिहास काय?
केंद्र सरकारच्या वतीने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ सातत्याने केला जातोय. त्यानुसार, मागील वेतन आयोगांनी अनेक पातळ्यांवर पगार वाढ दर्शविली आहे. सहाव्या वेतन आयोगाने (२००६) एकूण पगार आणि भत्त्यांमध्ये सुमारे ५४% वाढ दर्शविली. यानंतर, २०१६ मध्ये ७ वा वेतन आयोग लागू करण्यात आला, त्यानंतर मूळ पगार आणि इतर भत्त्यांमध्ये १४.३% वाढ केल्यानंतर, पहिल्या वर्षी सुमारे २३ टक्के वाढ दिसून आली.
पगाराचे मोजमाप कसे केले जाते?
सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात मूळ पगार, महागाई भत्ता (डीए), घरभाडे भत्ता (एचआरए), वाहतूक भत्ता (टीए) आणि इतर किरकोळ फायदे समाविष्ट आहेत. कालांतराने, मूळ पगाराचा वाटा एकूण पॅकेजच्या ६५% वरून सुमारे ५०% पर्यंत कमी झाला आहे आणि इतर भत्त्यांचा वाटा आणखी वाढला आहे. हे सर्व जोडूनच मासिक पगार दिला जातो. पेन्शनधारकांसाठीही असेच बदल असतात. तथापि, एचआरए किंवा टीए दिला जाणार नाही, असे सांगितले जातेय.












Click it and Unblock the Notifications