मुंबईत AI-आधारित नोकरी शोधाचा नवा ट्रेंड; LinkedIn चा रिपोर्ट वाचायलाचं हवा
मुंबईत नोकरीच्या शोधात असाल, तर AI आता तुमचं भवितव्य ठरवू शकतो. LinkedIn च्या नव्या अभ्यासानुसार, मुंबईतील तब्बल 83% रिक्रूटर्स त्यांच्या भरतीसाठीचा 70% बजेट AI आणि टेक्नॉलॉजी टूल्सवर खर्च करत आहेत. पारंपरिक पद्धतींऐवजी आता भरती प्रक्रियेत वेग, अचूकता आणि गुणवत्ता या बाबींना प्राधान्य दिलं जातंय. हे केवळ जलद हायरिंगपुरतं मर्यादित नसून, कौशल्यावर आधारित गुणवत्तेची निवड करण्यावरही भर आहे.

LinkedIn च्या रिपोर्टनुसार, 1,300 पेक्षा अधिक HR तज्ज्ञांशी देशभरात झालेल्या चर्चांनंतर हे निष्कर्ष समोर आले आहेत. मुंबईतील 67% रिक्रूटर्सना वाटतं की, उमेदवारांची निवड करताना डिग्रीपेक्षा त्यांच्याकडील प्रॅक्टिकल आणि ट्रान्सफरेबल स्किल्स अधिक महत्त्वाच्या ठरतात.
AI टूल्समुळे निवड प्रक्रिया अधिक अचूक
अॅडेको इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनिल चेमनकोटील यांच्या मते, भारतातील नोकरीचा चेहरामोहरा झपाट्याने बदलतोय. हायब्रिड प्रोफाइल्स आणि बदलत्या जबाबदाऱ्या लक्षात घेता पारंपरिक टायटल्स आणि सीव्ही पुरेसे नाहीत. LinkedIn Recruiter 2024 सारखी प्रगत AI टूल्स वापरून आता कंपन्या उमेदवारांच्या कौशल्यांवर आधारित पदं अधिक अचूकपणे ओळखू शकतात. यामुळे आधी दुर्लक्षित झालेलं टॅलेंटही आता समोर येऊ लागतंय.
टॅलेंट हायरिंग अजूनही आव्हानात्मक
देशभरातील उत्पादन (66%) आणि IT क्षेत्र (62%) स्किल्सवर लक्ष केंद्रित करत असतानाही योग्य उमेदवार मिळवणं अजूनही अवघड आहे. विशेषतः IT क्षेत्रात, 69% कंपन्यांना दर्जेदार उमेदवार मिळवण्यासाठी झगडावं लागतंय. मुंबईतील ग्लोबल कंपन्यांच्या कार्यालयांनाही स्थानिक पातळीवर टॅलेंट हायर करताना प्रशिक्षणाच्या संधींचा अभाव (56%) आणि वाढती स्पर्धा (55%) ही अडचण ठरते आहे.
LinkedIn Talent Solutionsच्या प्रमुख रूची आनंद यांचं म्हणणं आहे की, "मुंबईत रिक्रूटर्स फक्त AI ला स्वीकारत नाहीत, तर त्याचा कल्पक आणि प्रभावी वापर करून योग्य उमेदवार शोधण्यात यशस्वी ठरत आहेत. पारंपरिक डिग्री ऐवजी कौशल्यं आणि वैयक्तिक कनेक्शनला आता अधिक महत्त्व मिळतंय."
AI वापरामुळे भरती प्रक्रियेत वेग आणि परिणामकारकता
मुंबईतील 65% रिक्रूटर्स विविध AI-आधारित स्क्रिनिंग टूल्स वापरतात, तर 62% डेटा अॅनालिटिक्सचा वापर करून निर्णय घेतात. AI वापरल्यामुळे केवळ वेळ वाचतो असं नाही, तर भरतीचे निर्णयही अधिक योग्य ठरतात. देशभरात BFSI, IT आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात AI चा प्रभाव वाढतोय.
मुंबईत 45% रिक्रूटर्सना वाटतं की AI मुळे त्यांच्या कामाचा वेग वाढलाय. 41% म्हणतात की AI मुळे वेळखाऊ कामं कमी झाली असून, आता ते उमेदवारांचा अनुभव आणि स्टेकहोल्डर्सशी संवाद यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. तब्बल 92% रिक्रूटर्सना विश्वास आहे की भविष्यात ते "धोरणात्मक करिअर सल्लागार" बनतील. तर 94% AI चा वापर वैयक्तिक संवाद साधण्यासाठी करत आहेत.
LinkedIn चं AI टूल्स कसं बदलतं भरतीचं समीकरण?
LinkedIn Recruiter 2024 हे जनरेटिव्ह AI टूल रिक्रूटर्सना जलद आणि दर्जेदार उमेदवारांशी संपर्क साधायला मदत करतं. या टूलने पाठवलेले मेसेजेस 44% प्रतिसाद दर मिळवत आहेत, जे पारंपरिक पद्धतींपेक्षा 11% अधिक आहे.
याशिवाय, Hiring Assistant नावाचं एक टूल स्क्रिनिंग आणि सोर्सिंग ही कामं ऑटोमेट करतं, जे रिक्रूटर्ससाठी वेळखाऊ असतात. त्यामुळे भरती करणाऱ्या टीमना अधिक महत्त्वाच्या कामांवर - मुलाखती, विश्लेषण आणि सल्ला यावर लक्ष केंद्रित करता येतं.
AI हाच आता करिअरचा खरा साथीदार
मुंबईत नोकरी शोधताना डिग्रीपेक्षा कौशल्यांवर भर द्यावा लागेल, हे LinkedIn च्या या रिपोर्टवरून स्पष्ट होतं. AI आणि डेटा आधारित भरतीमुळे केवळ नोकरी शोधणाऱ्यांसाठीच नव्हे, तर कंपन्यांसाठीही ही क्रांती फायदेशीर ठरतेय. तुमच्याकडे योग्य स्किल्स आणि डिजिटल उपस्थिती असल्यास, AI च्या या युगात तुमच्या संधी निश्चितच वाढणार आहेत.












Click it and Unblock the Notifications