T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा ऐतिहासिक उलटफेर; ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव! हे कसं घडलं? वाचा
ZIM vs AUS T20 World Cup 2026 Zimbabwe Stun Australia : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिकेट विश्वाला हादरवून टाकणारा निकाल समोर आला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात जिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव केला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील हा या वर्षातील सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे. 2007 नंतर तब्बल 19 वर्षांनी जिम्बाब्वेने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपच्या लीग राऊंडमध्ये पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे.

ब्रायन बेनेटचे वादळी अर्धशतक
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला, जो जिम्बाब्वेच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. जिम्बाब्वेने 20 ओव्हरमध्ये केवळ 2 गडी गमावून 169 धावांचा आव्हानात्मक डोंगर उभा केला. ब्रायन बेनेटने 56 बॉल्समध्ये नाबाद 64 धावांची खेळी केली. त्याला तादिवानाशे मारुमनी (35) आणि रयान बर्ल (35) यांनी उत्तम साथ दिली. अखेरच्या टप्प्यात कर्णधार सिकंदर रझाने अवघ्या 13 चेंडूत 25 धावा कुटल्या.
मुजरबानीच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची शरणागती
170 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. मधल्या फळीतील दिग्गज फलंदाज फ्लॉप ठरले. मॅट रेनशॉने (65) एका बाजूने खिंड लढवली, पण दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत राहिल्या. जिम्बाब्वेच्या ब्लेसींग मुजरबानीने भेदक मारा करत 4 विकेट्स घेतल्या, तर ब्रॅडली इवांसने 3 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा डाव 19.3 ओव्हरमध्ये 146 धावांवर संपुष्टात आला.
बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव का झाला? 5 मुख्य कारणे
ऑस्ट्रेलियासारखा जागतिक विजेता संघ जिम्बाब्वेसारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाकडून का हरला, याची महत्त्वाची कारणे आहेत.
मधल्या फळीचा 'कोलमडलेला' कणा
ऑस्ट्रेलियाची मधल्या फळीतील ताकद मानले जाणारे मार्कस स्टोयनिस (6), ट्रॅव्हिस हेड (17) आणि जोश इंग्लिस (8) पूर्णपणे अपयशी ठरले. टिम डेविड आणि कॅमरन ग्रीन यांसारखे मोठे हिटर तर शून्यावर बाद झाले. एकाकी पडलेल्या मॅट रेनशॉवर दबाब वाढला.
ब्लेसींग मुजरबानीचा घातक स्पेल
मुजरबानीने आपल्या उंचीचा आणि वेगाचा अचूक वापर करत ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या विकेट्स काढल्या. त्याच्या धारदार बॉलिंगमुळे कांगारू फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही.
फिरकी आणि संथ खेळपट्टीचा अंदाज चुकणे
कोलंबोची आर. प्रेमदासा खेळपट्टी जशी जुनी होते, तशी ती संथ होत जाते. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला, पण बॉल बॅटवर नीट येत नसल्याने त्यांनी चुकीचे फटके मारून विकेट्स गमावल्या.
झिम्बाब्वेची शिस्तबद्ध फिल्डिंग
जिम्बाब्वेने या सामन्यात केवळ बॅटिंग आणि बॉलिंगमध्येच नाही, तर फिल्डिंगमध्येही ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. त्यांनी घेतलेले अप्रतिम झेल आणि वाचवलेल्या धावांमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे मनोबल खचले.
ब्रायन बेनेटची एँकर इनिंग
ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला, पण ब्रायन बेनेटने एक बाजू लावून धरली. त्याने घाई न करता शेवटपर्यंत फलंदाजी केली, ज्यामुळे जिम्बाब्वेला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.












Click it and Unblock the Notifications