आरसीबीला मोठा धक्का, 'हा' खेळाडू आता लीगमध्ये खेळू शकणार नाही; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
आरसीबीचा (RCB) खेळाडू यश दयालच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून खूप काही घडामोडी सुरू आहेत. त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला असून, त्यासंदर्भात गुन्हाही दाखल झाला आहे. एका नव्हे तर दोन वेगवेगळ्या राज्यांत त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल असून, या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवरही संकट आले आहे. यश दयालवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका महत्त्वाच्या टी२० लीगमध्ये त्याला खेळण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, यश दयालला उत्तर प्रदेश टी२० लीगमध्ये (UP T20 League) खेळण्यापासून रोखण्यात आले आहे. या लीगमध्ये तो गोरखपूर लायन्स संघाकडून खेळणार होता. त्याला या वर्षीच्या लिलावात ७ लाख रुपयांना विकत घेण्यात आले होते. गाझियाबादमधील एका मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर जयपूरमध्येही एका मुलीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
दैनिक जागरणच्या एका रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (UPCA) यश दयालवर दाखल असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे त्याला यूपी टी२० लीगमध्ये खेळण्यापासून प्रतिबंधित केले आहे. गोरखपुर लायन्स संघाचे मालक विशेष गौर यांनी दावा केला आहे की, या निर्णयाबद्दल त्यांना UPCA कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. गौर यांनी स्पष्ट केले की, यश दयालच्या उपलब्धतेबद्दल संघाला कोणताही नवीन अपडेट मिळालेला नाही.
गाझियाबादच्या इंदिरापुरम पोलीस ठाण्यात एका तरुणीने यश दयालविरोधात तक्रार दाखल केली होती. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि तिचे शोषण केले, असा आरोप तिने केला आहे. त्यानंतर जयपूरमध्येही एका मुलीने गुन्हा दाखल केला होता आणि राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications