WPL 2025 Final : अंतिम सामना कोण जिंकेल, दिल्ली की मुंबई? कोणाचा पगडा भारी, घ्या जाणून
WPL 2025 Final DEL-W vs MUM : WPL 2025 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुध्द मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. शनिवारी 15 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
गट टप्प्याच्या शेवटी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवल्यानंतर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यांनी खेळलेल्या आठ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आणि तीन गमावले आहेत.

अंतिम सामना दिल्ली विरुध्द मुंबई यांच्यात होईल
दरम्यान मुंबईने समान विजय आणि पराभवांसह दुसरे स्थान पटकावलं आहे. तसे त्यांचा नेट रन-रेट (NRR) दिल्लीच्या +0.396 च्या तुलनेत +0.192 होता. एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सचा 47 धावांनी पराभव करून मुंबईने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी 20 षटकांत 4 बाद 213 धावा केल्या आणि त्यानंतर गुजरातला 166 धावांत गुंडाळलं आहे. या हंगामात अंतिम फेरीतील स्पर्धक आधीच दोनदा एकमेकांशी भिडले आहेत, दोन्ही वेळा दिल्लीने सामना जिंकला आहे.
खेळपट्टीचा फायदा कोणाला होईल?
कॅपिटल्सने वडोदरा येथे झालेला पहिला सामना दोन विकेट्सने आणि बेंगळुरू येथे झालेला दुसरा सामना नऊ विकेट्सने सामना जिंकला होता. ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 197 आहे. तिन्ही सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.
कोणाची बाजू वरचढ आहे ते जाणून घ्या
महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने वरचढ कामगिरी केली आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये अंतिम फेरीत सामना झाला. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला. पण एकंदरीत दिल्लीचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांनी आपापसात 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी दिल्लीने चार वेळा विजय मिळवला आहे.
दिल्ली कॅपिटल्स महिला: मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (यष्टीरक्षक), निकी प्रसाद, शिखा पांडे, टायटस साधू, मिन्नू मणी.
मुंबई इंडियन्स महिला: हरमनप्रीत कौर (कर्णधार),हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनम इस्माईल, सईका इशाक.












Click it and Unblock the Notifications