ओव्हल कसोटीत जडेजाने सामना का थांबवला?, लाल शर्टचा संबंध अन् नेमकं काय घडलं, पाहा-Video!
Why Did Ravindra Jadeja Stop Play in Oval Test : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील ओव्हल कसोटीमध्ये भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा चर्चेचा विषय ठरला आहे.
त्याने केलेल्या शानदार अर्धशतकापेक्षाही, मैदानात घडलेल्या एका अनोख्या घटनेमुळे तो अधिक चर्चेत आहे. एका प्रेक्षकाच्या लाल टी-शर्टमुळे जडेजाला चेंडू पाहण्यात अडचण येत होती, आणि त्यामुळे त्याने सामना थांबवला. त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.
लाल टी-शर्टमुळे चेंडू दिसण्यात अडचण
शनिवारी ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात जडेजा फलंदाजी करत होता. तो गस ॲटकिन्सनच्या एका षटकाचा सामना करत असताना, त्याचे लक्ष थेट स्टँडमध्ये बसलेल्या एका प्रेक्षकाकडे गेले. या प्रेक्षकाने लाल रंगाचा टी-शर्ट घातला होता आणि तो गोलंदाजाच्या अगदी हाताच्या मागे बसला होता. त्यामुळे, जडेजाला गोलंदाजाच्या हातातून बाहेर पडणारा चेंडू स्पष्टपणे दिसत नव्हता.

असा शोधला उपाय!
जडेजाने लगेचच मैदानी पंचांकडे तक्रार केली आणि त्या प्रेक्षकाला जागा बदलण्यास सांगितले. सुरुवातीला तो प्रेक्षक जागा सोडण्यास तयार नव्हता. यावर स्टेडियमच्या एका अधिकाऱ्याने तोडगा काढला. त्या प्रेक्षकाला एक हलक्या रंगाचा टी-शर्ट देण्यात आला, जो त्याने घालून जुना टी-शर्ट झाकला. या उपायावर जडेजा समाधानी झाला आणि त्याने प्रेक्षकांना अंगठा दाखवून आभार मानले. हा मजेदार क्षण पाहून मैदानावरील प्रत्येकजण हसू लागला.
Red shirt, but total green flag 💚#SonySportsNetwork #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/gkV3t21x6K
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 2, 2025
भारताची विजयाकडे वाटचाल!
जडेजाने 53 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून भारताला मजबूत स्थितीत आणले. यशस्वी जयस्वालच्या 118 धावा, आकाश दीपच्या 66 धावा आणि जडेजा-वॉशिंग्टन सुंदर यांच्या 53-53 धावांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 396 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 374 धावांचे मोठे आव्हान उभे राहिले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडने 1 बाद 50 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असताना, इंग्लंड 3 बाद 111 धावांवर खेळत आहे आणि त्यांना विजयासाठी अजून 263 धावांची आवश्यकता आहे. भारताकडे ही कसोटी जिंकून मालिका 2-2 अशी बरोबरीत आणण्याची उत्तम संधी आहे.












Click it and Unblock the Notifications