R अश्विनच्या जागी मुंबईचा 26 वर्षीय तनुष कोटियन, जाणून घ्या- त्याच्याविषयी, कशी झाली खेळाची सुरूवात
Who is Tanush Kotian : रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात एक जागा रिक्त झाली आहे. अश्विन गेल्यानंतर कोण येणार याचीच चर्चा होती. दरम्यान, अश्विनच्या बदलीची घोषणा झाल्याची बातमी समोर आली आहे. संघात एका तरुणाचा समावेश करण्यात आला असून तो मुंबईचा असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे, मोहम्मद शमीची दुखापत सावरत नसल्याचेही वृत्त आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करून शमीच्या गुडघ्याला सूज आली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतला आहे पण कसोटी सामन्यात खेळण्यासाठी त्याला पूर्ण रिकव्हरीची गरज आहे.
त्यातच अश्विनच्या जागी आलेल्या खेळाडूचे नाव तनुष कोटियन असून तो मुंबईचा आहे. सध्या तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत असून त्याचे वय 26 वर्षे आहे. मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी तो ऑस्ट्रेलियात पोहोचण्याची शक्यता आहे.

तनुषने नुकताच केला होता ऑस्ट्रेलिया दौरा
तनुषने नुकताच भारत अ संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेला होता, त्यामुळे व्हिसाच्या बाबतीत कोणतीही अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे. कोटियनचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. तो ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो आणि फलंदाजी कशी करायची हे देखील त्याला ठाऊक आहे.
अष्टपैलू खेळाडू म्हणून तनुषची ओळख
तनुष कोटियन हा अष्टपैलू खेळाडू आहे त्याने 33 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 41.21 च्या सरासरीने 1525 धावा केल्या आणि 25.70 च्या सरासरीने 101 बळी घेतले. 2023-24 मधील मुंबईच्या रणजी ट्रॉफी-विजेत्या मोहिमेमध्ये त्याला टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. त्याची चमकदार कामगिरी त्या स्पर्धेत पाहायला मिळाली, जिथे त्याने 41.83 च्या सरासरीने 502 धावा केल्या. तसेच 16.96 च्या सरासरीने 29 बळी घेतले.
दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. गाबा, ब्रिस्बेन येथे खेळलेला सामना अनिर्णित राहिला. चौथी कसोटी 26 डिसेंबर रोजी बॉक्सिंग डे कसोटी म्हणून खेळली जाईल.












Click it and Unblock the Notifications