Video : विमानतळावर विराट कोहलीला चाहत्यांचा वेढा; कडक सुरक्षेत 'रन मॅन'ला काढले बाहेर!
Virat Kohli Airport Video Viral : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी एकदिवसीय मालिकेचा थरार ११ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आज वडोदरा येथे दाखल झाला.
विराट विमानतळावर पोहोचताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. "कोहली... कोहली..." च्या जयघोषाने संपूर्ण विमानतळ परिसर दुमदुमून गेला होता.

सुरक्षारक्षकांची मोठी कसरत!
विमानतळावर चाहत्यांच्या अलोट गर्दीमुळे विराटला बाहेर पडणे कठीण झाले होते. काळा टी-शर्ट आणि सनग्लासेस अशा 'कुल' लुकमध्ये असलेल्या विराटला पाहण्यासाठी चाहत्यांची चढाओढ लागली होती. अखेर सुरक्षा रक्षकांनी कडे कडक सुरक्षा कडे करत विराटला गर्दीतून सुखरूप बाहेर काढले आणि त्याच्या गाडीपर्यंत पोहोचवले. या थरारक स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
#WATCH | Gujarat: Former Indian Captain and Star Cricketer Virat Kohli arrives at Vadodara for Team India's ODI match against New Zealand on 11th January. pic.twitter.com/cQbhCghMZy
— ANI (@ANI) January 7, 2026
जबरदस्त फॉर्म आणि विक्रमांचा पाऊस!
विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून त्याने अलीकडेच मैदानात धावांचा पाऊस पाडला आहे:
विजय हजारे ट्रॉफीतील धमाका
दिल्लीकडून खेळताना विराटने अवघ्या दोन सामन्यांत २०८ धावा कुटल्या. यात आंध्र प्रदेशविरुद्ध १३१ आणि गुजरातविरुद्ध ७७ धावांच्या खेळीचा समावेश आहे.
सचिनचा विक्रम मोडीत
या कामगिरीसह विराटने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,००० धावा पूर्ण केल्या आहेत. सचिन तेंडुलकरला मागे टाकत तो सर्वात जलद १६,००० लिस्ट ए धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
दक्षिण आफ्रिका दौरा: नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटने ३ सामन्यांत ३०२ धावा (२ शतके, १ अर्धशतक) करत आपला दरारा सिद्ध केला आहे.
28,000 आंतरराष्ट्रीय धावांच्या उंबरठ्यावर!
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विराट एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घालू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला आता फक्त २५ धावांची गरज आहे. हा पल्ला गाठताच सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्या पंक्तीत बसणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरेल.
वडोदरा येथे विराटसह युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी देखील दाखल झाले असून, संघातील इतर खेळाडू लवकरच पोहोचण्याची शक्यता आहे. विराटचा हा फॉर्म पाहता न्यूझीलंडच्या गोलंदाजांची झोप उडणार हे नक्की!












Click it and Unblock the Notifications