T20 World Cup: टीट्वेंटी विश्वचषक विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, आयसीसीकडून रकमेची घोषणा
आयसीसीने 2024 टी ट्वेंटी विश्वचषकासाठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. आयसीसीने स्पर्धेसाठी 93.51 कोटी रुपये (US$11.25 दशलक्ष) एवढी बक्षीस रक्कम ठेवली आहे. ही रक्कम सर्व टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेपेक्षा जास्त आहे.
गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील बक्षीस रकमेचे बजेट 82.93 कोटी रुपये (US$ 10 दशलक्ष) होते. भारतीय संघाने 5 जूनला आयर्लंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळला होता. स्पर्धेचा अंतिम सामना आज 29 जून रोजी होणार आहे.

आयसीसीने जाहीर केली बक्षीस रक्कम
आयसीसीने सोमवारी सांगितले की, विजेत्या संघाला 20.36 कोटी रुपये (US$2.45 दशलक्ष) मिळतील. यापूर्वीच्या कोणत्याही T20 विश्वचषकात विजेत्या संघाला इतके पैसे मिळाले नव्हते. यावर्षी या स्पर्धेत विक्रमी 20 संघ खेळत आहेत. त्यामुळे याला आतापर्यंतचा सर्वात मोठा T20 विश्वचषक म्हटले जात आहे.
त्याच वेळी, अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला 10.64 कोटी (US$१.२८ दशलक्ष) वर समाधान मानावे लागेल. उपांत्य फेरी खेळल्यानंतर बाहेर पडलेल्या संघांना 6.54 कोटी रुपये (787,500 US डॉलर) मिळतील.
सुपर-एट फेरीतून बाहेर पडूनही पैशांचा पाऊस
जे संघ दुसरी फेरी म्हणजेच सुपर-8 फेरी पार करण्यात अपयशी ठरतील त्यांना 3.17 कोटी रुपये (382,500 US डॉलर) मिळतील. त्याच वेळी, 9व्या ते 12व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 2.05 कोटी रुपये (247,500 यूएस डॉलर) मिळतील.
13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या प्रत्येक संघाला 1.87 कोटी रुपये (US$225,000) मिळतील. याशिवाय स्पर्धेतील एक सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघाला अतिरिक्त 25.89 लाख रुपये (31,154 यूएस डॉलर) दिले जातील. यात उपांत्य आणि अंतिम सामन्यांचा समावेश नाही. हा नियम सुपर-8 फेरीपर्यंत लागू आहे.
T20 विश्वचषकात एकूण 55 सामने
T20 विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीच्या फेरीत म्हणजेच गृप स्टेजमध्ये 40 सामने खेळवले गेले. 20 संघांची प्रत्येकी पाचच्या चार गटात विभागणी करण्यात आली होती. ग्रुप स्टेजमध्ये आपापल्या गटात अव्वल असणारे दोन संघ सुपर-8 मध्ये पोहोचले. यानंतर सुपर-8 फेरी सुरू झाली.
त्यानंतर उपांत्य फेरी झाली असून आता अंतिम सामना 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये खेळवला जाईल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या या अंतिम सामन्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.
बक्षिसाची रक्कम जाहीर करताना आयसीसीने सांगितले की, ही स्पर्धा अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे, त्यामुळे बक्षिसाची रक्कमही ऐतिहासिक ठेवण्यात आली आहे. आम्हाला हा सर्वात यशस्वी T20 विश्वचषक बनवायचा आहे.












Click it and Unblock the Notifications