चॅम्पिअन ट्राँफीपूर्वीच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे भारताविरोधी धक्कादायक वक्तव्य; भुवया उंचावल्या
सध्या चॅम्पिअन ट्राँफीची धूम सुरु आहे. भारत व पाकिस्तान हे दोन्ही संघ यात एकमेकांविरोधात लढणार आहेत. या दोन्ही संघातील लढत जगभरातील क्रिकेट शौकिनांसाठी पर्वणी ठरणार आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी टीम इंडियाविरोधात केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले शेहबाज शरीफ?
लाहोरमधील नूतनीकरण केलेल्या गद्दाफी स्टेडीअमचे उद्धाटन आज पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्धाटन कार्यक्रमात शरीफ यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले, आगामी २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान संघाचे खरे आव्हान केवळ विजेतेपद जिंकणे नाही. तर शेजारील देश भारताला हरवणे हेच आहे. ते पुढे म्हणाले की, "आमच्याकडे खूप चांगली टीम आहे. त्यांनी अलिकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. पण आता खरे आव्हान केवळ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणेच नाही तर दुबईतील आगामी सामन्यात आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी भारताला हरवणे देखील आहे. संपूर्ण देश त्यांच्या मागे उभा आहे," असे शरीफ यांनी म्हटल्याने सर्वांच्यात भुवया उंचावल्या.
पहिल्यांदाच आयोजन
पाकिस्तान पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत आहे. १९९६ नंतर येथे खेळला जाणारा हा पहिलाच आयसीसी कार्यक्रम आहे. बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या संघाला पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवीली जाणार आहे. त्यामुळे भारताचे सामने दुबईत होणार आहेत. स्पर्धेच्या आयोजनाबाबत शरीफ म्हणाले की, "जवळपास २९ वर्षांनंतर आपण आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करत आहोत. ही पाकिस्तानसाठी एक मोठी संधी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आमचा संघ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देशाला जिंकून दाखवेल."
११७ दिवसांत नुतनीकरण
लाहोरमधील नूतनीकरण केलेल्या गद्दाफी स्टेडीअमचे आज उद्धाटन झाले. या स्टेडियमच्या उद्घाटन समारंभाला राजकारणी, सरकारी अधिकारी, पीसीबी प्रतिनिधी, राष्ट्रीय पुरुष संघाचा संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी संघ, पाकिस्तान सुपर लीग फ्रँचायझी मालक आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष झका अशरफ आणि नजम सेठी यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. केवळ ११७ दिवसांत हे नूतनीकरण करण्यात आले. पीसीबीने स्पर्धेसाठी संघाची जर्सीही याच कार्यक्रमात लाँच केली. पाकिस्तान १९ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळेल.












Click it and Unblock the Notifications