ऋषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी; इंग्लंडमध्ये 'ही' कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी अंतर्गत लीड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या उपकर्णधार ऋषभ पंतने भारतीय कसोटी इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पंतने दोन्ही डावांत शतक झळकावत ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या 93 वर्षांच्या प्रवासात ही अभूतपूर्व कामगिरी प्रथमच घडली आहे.

दोन्ही डावात झळकावली दमदार शतके
पहिल्या डावात 134 धावांची लढवय्यी खेळी साकारल्यानंतर, दुसऱ्या डावात पंतने 118 धावा करत आपलं दुसरं शतक पूर्ण केलं. 140 चेंडूंमध्ये त्याने 15 चौकार आणि 3 षटकार खेचले. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या मैदानावर हा त्याचा चौथा कसोटी शतक आहे.
भारतीय कसोटीत पहिल्यांदाच पाच शतके
या सामन्यात पंतसह एकूण पाच भारतीय फलंदाजांनी शतक झळकावली आहेत - यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, के.एल. राहुल आणि पंतच्या दोन शतकांचा समावेश आहे. भारतीय कसोटी संघाच्या इतिहासात एका सामन्यात पाच शतकं झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामुळे भारताने इंग्लंडवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
दोन्ही डावात शतक करणारा सातवा भारतीय
कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक ठोकणाऱ्या ऋषभ पंतचा समावेश आता भारतीय दिग्गज फलंदाजांच्या यादीत झाला आहे. सुनील गावसकर (3 वेळा), राहुल द्रविड (2 वेळा), विजय हजारे, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्यानंतर पंतने सातवा भारतीय म्हणून हे यश मिळवलं आहे.
जगात फक्त दुसरा यष्टीरक्षक
पंतची आणखी एक खास कामगिरी म्हणजे तो जगभरातील फक्त दुसरा यष्टीरक्षक आहे, ज्याने कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक ठोकले आहे. यापूर्वी केवळ झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवरच हे करु शकला होता. 2001 मध्ये फ्लॉवरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 142 आणि नाबाद 199 धावांची खेळी केली होती.
भारत सामन्यात मजबूत स्थितीत
या सामन्यात ऋषभ पंतसह अन्य फलंदाजांनी देखील अपूर्व कामगिरी करत भारताला मजबूत स्थितीत नेले आहे. शेवटचा दिवस शिल्लक असताना भारताचा विजय जवळ दिसत आहे आणि पंतची ही ऐतिहासिक खेळी संघासाठी निर्णायक ठरू शकते.
ऋषभ पंतच्या या द्विशतकी पराक्रमामुळे केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक क्रिकेटलाही एक ऐतिहासिक क्षण मिळाला आहे. त्याचा आत्मविश्वास, आक्रमकता आणि संयम यामुळे तो पुन्हा एकदा टीम इंडियाचा 'गेम चेंजर' ठरत आहे.












Click it and Unblock the Notifications