CSK चा नाशिकचा खेळाडू रामकृष्ण घोषची जादुई गोलंदाजी; विजय हजारे ट्रॉफीत यश, रोहीत पवारांची खास पोस्ट
Ramkrishna Ghosh Maiden Over vs Goa Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या हंगामात महाराष्ट्राच्या संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात गोव्याचा ५ धावांनी पराभव केला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे नाशिकचा वेगवान गोलंदाज रामकृष्ण घोष. विजयासाठी शेवटच्या षटकात ६ धावांची गरज असताना रामकृष्णने मेडन ओव्हर (षटकात एकही धाव न देणे) टाकत अशक्य वाटणारा विजय महाराष्ट्राच्या खिशात टाकला. हा सामना ८ जानेवारी २०२६ ला झाला, या सामन्यानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहीत पवार यांनी एक खास पोस्ट केली आहे. जाणून घेऊया. सामना, निकाल आणि पोस्ट..

नेमका कोणता सामना होता?
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शानदार शतकी (१३४ धावा) खेळीच्या जोरावर ७ बाद २४९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल गोव्याने चांगली झुंज दिली. गोव्याला विजयासाठी शेवटच्या १८ चेंडूत ११ धावा हव्या होत्या आणि त्यांच्याकडे विकेट्स शिल्लक होत्या.
अशा दबावाच्या परिस्थितीत महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज रामकृष्ण घोषने ४८ वे षटक टाकले, जे त्याने मेडन टाकले. त्यानंतर ४९ व्या षटकात ५ धावा आल्या. शेवटच्या ६ चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज असताना रामकृष्णने पुन्हा एकदा चेंडू हातात घेतला आणि ५० व्या षटकातील सहाच्या सहा चेंडू निर्धाव टाकून गोव्याच्या तोंडून विजयाचा घास हिरावला.
असे क्रिकेटर्स महाराष्ट्राने घडवलेत!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 9, 2026
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध गोवा सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात ७ बाद २४९ धावा केल्या. गोव्याला विजयासाठी शेवटच्या ३ षटकांत ११ धावांची गरज होती. त्याच वेळी महाराष्ट्राकडून ४८ वे आणि ५० वे षटक रामकृष्ण घोषने टाकले. या… pic.twitter.com/L8X0lR8oag
कोण आहे रामकृष्ण घोष?
- रामकृष्ण घोष हा मूळचा नाशिकचा रहिवासी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या रामकृष्णने आपल्या वेगाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
- शोध महावेगाचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 'महा स्पीडस्टार: शोध महावेगाचा' या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून रामकृष्ण पुढे आला. या स्पर्धेत त्याने सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला होता.
- CSK कडून खेळणार रामकृष्ण घोष.. त्याच्या अष्टपैलू कामगिरीची दखल घेत आयपीएल २०२५ च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने त्याला ३० लाख रुपयांना आपल्या संघात सामील केले होते. आगामी आयपीएल २०२६ साठी देखील सीएसकेने त्याला रिटेन (कायम) केले आहे.
- विक्रमी कामगिरी खासच.. याच स्पर्धेत काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशविरुद्ध खेळताना रामकृष्णने अवघ्या ४२ धावांत ७ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता, जो महाराष्ट्र क्रिकेटच्या इतिहासातील एक विक्रम आहे.
रोहित पवार यांनी व्यक्त केला सार्थ अभिमान
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष रोहित पवार यांनी रामकृष्णच्या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले की, "खऱ्या अर्थाने तळागाळातील टॅलेंट शोधण्याचं काम 'महा स्पीडस्टार' उपक्रमातून यशस्वी झालं आहे. रामकृष्णने ज्या पद्धतीने सामना फिरवला, त्याचा आम्हाला अभिमान आहे."
हेही वाचा : WPL 2026: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला मॅचचा थरार! RCB की मुंबई, डब्ल्युपीएलचा पहिला सामना कुणी जिंकला












Click it and Unblock the Notifications