मिस्टर कूल राहुल द्रविड यांनाही आवरल्या नाही भावना, जल्लोषाचा व्हिडिओ तूफान व्हायरल
राहुल द्रविड यांची ही स्टाईल तुम्ही कधीही पाहिली नसेल, टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड आपल्या भावना रोखू शकले नाहीत.टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या रोमहर्षक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून इतिहास रचला.
चढ-उतारांनी भरलेल्या या अंतिम सामन्यात एक वेळ अशी आली की भारत हा सामना हरणार असे सर्वांना वाटत होते. क्लासेन आणि मिलरने हा सामना जवळपास एकतर्फी करून टाकला होता. भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसू लागली होती.

त्यानंतर पंड्या, बुमराह आणि अर्शदीप या त्रिकुटाने आणि भारतीय क्षेत्ररक्षकांच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाने सामन्यात असे पुनरागमन केले की इतिहासाच्या पानात त्याची नोंद झाली. मिस्टर कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविड यांचाही प्रशिक्षक म्हणून हा शेवटचा सामना होता.
टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमधील शानदार विजयानंतर राहुल द्रविड यांनाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. कोहलीने राहुल द्रविड यांच्याकडे ट्रॉफी सुपूर्द करताच 'मिस्टर कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गजाने मोकळेपणाने सेलिब्रेशन केले आणि विजयाचे क्षण संघासोबत शेअर केले.
द्रविड यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट कोहलीने हातात ट्रॉफी दिल्यानंतर द्रविड यांनी ज्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या ते खरच पाहण्यासारखे होते. वर्षानुवर्षे एखाद्या क्षणाची वाट पहावी आणि तो क्षण प्रत्यक्षात यावा अशा स्वरुपाच्या भावना द्रविड यांच्या जल्लोषात पहायला मिळाल्या.
Bookmark this. pic.twitter.com/7aTgdpOo6n
— Gaurav Jain (@gaurav28jain) June 29, 2024
राहुल द्रविड एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून कधीच विश्वचषक जिंकू शकले नाही, पण आता त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात टीम इंडिया विश्वचषक विजेती ठरली.
माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत: द्रविड
भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल द्रविड म्हणाले, "माझ्याकडे सांगण्यासाठी शब्द नाहीत, मला या संघाचा अभिमान आहे. सुरूवातीला आम्ही ३ विकेट गमावल्या. मात्र मुले लढत राहिली. हा माझ्या जीवनातील एक संस्मरणीय क्षण आहे. ज्यांच्यामुळे हा क्षण माझ्या वाट्याला आला मी त्यांचा आभारी आहे.
राहुल द्रविड म्हणाले, "खेळाडू म्हणून ट्रॉफी जिंकण्याइतका मी भाग्यवान नव्हतो. पण तेव्हाही मी माझे सर्वोत्तम दिले. एका संघाचा प्रशिक्षक बनण्याची संधी मिळाल्याने मी नशीबवान होतो. असा संघ मला मिळाला त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. या संघामुळेच माझ्यासाठी ही ट्रॉफी जिंकणे शक्य झाले. हा एक चांगला प्रवास होता अशा शब्दांत राहुल द्रविड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला
2021 च्या T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाली होती. 2023 च्या विश्वचषकानंतर द्रविड यांचा कार्यकाळ संपला होता. मात्र बीसीसीआयने तो T20 विश्वचषकापर्यंत वाढवला होता. कालचा अंतिम सामना राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना होता.












Click it and Unblock the Notifications