बय गेली अन् बयची वाकळही; PAK क्रिकेटमध्ये खळबळ, फ्लॉप शोमुळे खेळाडूंना प्रत्येकी 50 लाखांचा दंड
PCB fines Pakistan players : टी-20 विश्वचषकातील अत्यंत लाजीरवाण्या कामगिरीचे पडसाद आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (PCB) उमटू लागले आहेत. केवळ सल्ले आणि इशारे देऊन न थांबता, बोर्डाने आता थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे संतप्त झालेल्या पीसीबीने संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख पाकिस्तानी रुपये (सुमारे 16.28 लाख भारतीय रुपये) दंड ठोठावला आहे.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर 'शिक्षा' निश्चित
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, जर खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी बक्षिसे दिली जातात, तर मानहानीकारक पराभवासाठी त्यांना शिक्षाही भोगावी लागेल. विशेषतः चिरंतन प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या ६१ धावांनी झालेल्या पराभवानंतर बोर्डाचा संयम सुटला. हा ऐतिहासिक दंडाचा निर्णय भारताविरुद्धच्या सामन्यानंतर लगेचच संघाला कळवण्यात आला होता.
पगारावर गदा: कोणाला किती फटका?
पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय खेळाडूंना चार श्रेणींमध्ये (A, B, C, D) मासिक वेतन दिले जाते. मात्र, जुलै २०२५ ते जून २०२६ या करारात 'A' श्रेणीत एकाही खेळाडूचा समावेश नसल्याने, या दंडाचा सर्वाधिक फटका 'B', 'C' आणि 'D' श्रेणीतील खेळाडूंना बसणार आहे.
श्रेणी B : या खेळाडूंचा साधारण एक महिन्याचा पगार दंडापोटी कापला जाईल.
श्रेणी C आणि D : या श्रेणीतील खेळाडूंना आपल्या २ ते ३ महिन्यांच्या पगारावर पाणी सोडावे लागणार आहे.
बोर्डाच्या या भूमिकेमुळे आता खेळाडूंना केवळ मैदानावरील कामगिरीच्या आधारावरच आर्थिक लाभ मिळतील, हे स्पष्ट झाले आहे.
विश्वचषकातील पाकिस्तानचा अडखळणारा प्रवास
या स्पर्धेत पाकिस्तानची सुरुवातच खराब झाली होती.
गट टप्पा : नेदरलँड्स आणि अमेरिकेविरुद्ध कसाबसा विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानला मोठी आशा होती. मात्र, श्रीलंकेच्या खेळपट्टीवर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला.
सुपर ८ मधील निराशा : नामिबियाला हरवून संघ सुपर ८ मध्ये पोहोचला खरा, पण तिथे नशिबानेही साथ दिली नाही. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर इंग्लंडविरुद्धचा अटीतटीचा सामना पाकिस्तानने गमावला.
बाहेरचा रस्ता : श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात विजय मिळवूनही, 'नेट रन रेट' कमी असल्यामुळे पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली.
वैयक्तिक कामगिरीचा रिपोर्ट कार्ड: फलंदाज ठरले अपयशी
पाकिस्तानच्या या पराभवाचे मुख्य कारण फलंदाजांचे सामूहिक अपयश हेच राहिले.
साहिबजादा फरहान : स्पर्धेत ३८३ धावा करून त्याने एकाकी झुंज दिली.
दिग्गजांचा फ्लॉप शो : बाबर आझम, सैम अयुब, सलमान अली आघा आणि उस्मान खान यांसारख्या प्रमुख फलंदाजांना पूर्ण स्पर्धेत १०० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.
गोलंदाजी : फिरकीपटू उस्मान तारिकने १० बळी मिळवून आपली छाप पाडली, मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून हवी तशी साथ लाभली नाही.












Click it and Unblock the Notifications