IPL 2026 Auction: आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली कुणावर लागणार? जाणून घ्या लिलाव कुठे बघायचा अन् वेळ
IPL 2026 Mini Auction Date Time and Live Streaming : क्रिकेटच्या मैदानावरची खरी 'डील' जिथे होते, ती IPL लिलाव नगरी आता सज्ज झाली आहे! इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ साठीच्या मिनी-ऑक्शनचा थरार आज, १६ डिसेंबर रोजी रंगणार आहे. यावर्षी सलग तिसऱ्यांदा लिलावाचा अड्डा भारताबाहेर - युएईमधील अबु धाबी येथील एतिहाद अरेना येथे - सजला आहे.
फ्रँचायझी मालकांच्या 'वॉर रूम'मधील रणनीती, खेळाडूंची स्वप्ने आणि पैशांची रणधुमाळी पाहण्यासाठी तयार राहा, कारण या वर्षी ₹२३७.५५ कोटींचा खजिना खेळाडूंमध्ये वाटला जाणार आहे! भारताच्या वेळेनुसार दुपारी २.३० वाजता आयपीएलच्या लिलावाला सुरुवात होणार आहे, म्हणजेच दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून आयपीएलमध्ये खेळाडूंवर बोली लावायला सुरुवात होणार आहे.

सर्वाधिक 'पॉवर' कोणाकडे?
आयपीएलच्या या लिलावात बोली लावण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वाधिक ₹६४.३० कोटी रुपये शिल्लक आहेत. तर चेन्नई सुपर किंग्सकडेही ₹४३.४० कोटी रुपयांचा मोठा बटुआ आहे.
कुठे पाहाल हा थरार? (Live Streaming & Broadcast)
टीव्हीवर: सर्व बोली आणि हाय-व्होल्टेज ड्रामा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
मोफत स्ट्रीमिंग: डिजिटल युगात, स्ट्रीमिंगचे अधिकार जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाईट कडे आहेत. तिथे तुम्ही हा लिलाव कोणत्याही शुल्काशिवाय पाहू शकता, असे मीडिया रिपोर्ट सांगतात.
या 'स्टार्स'वर लागणार मोठी बोली!
या मिनी-ऑक्शनमध्ये काही मोठे आणि 'ब्रांडेड' खेळाडू गैरहजर असल्यामुळे, उर्वरित ताकदीच्या खेळाडूंवर फ्रँचायझी अक्षरशः नोटा उधळतील अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान अष्टपैलू कॅमरून ग्रीन हा यंदाचा 'हॉट प्रॉपर्टी' आहे. त्याची धारदार गोलंदाजी आणि टॉप-ऑर्डरमध्ये विस्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता त्याला चेन्नई सुपर किंग्जसह अनेक संघांच्या विशलिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवते.
भारतीय अष्टपैलू अन् पॉवर-हिटर्स
स्फोटक सलामी आणि मध्यम गती गोलंदाजी व्यंकटेश अय्यर वर कोलकाता नाईट रायडर संघ 'घर वापसी'साठी तर इतर संघ ताकद वाढवण्यासाठी डाव लावतील. तसेच लियाम लिविंगस्टोन हा मध्य फळीतील 'गेम चेंजर' फलंदाज आणि पार्ट-टाईम स्पिन गोलंदाज म्हणून अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
सर्वात वयस्कर, सर्वात तरुण कोण?
मध्य षटकांमध्ये बळी मिळवून देणारे भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोई आणि राहुल चाहर हेही संघांच्या रडारवर असतील. या लिलावात ३९ वर्षांचे जलज सक्सेना सर्वात वयस्कर आणि अफगाणिस्तानचा वाहिदुल्लाह झादरान सर्वात युवा खेळाडू आहे. अनुभव आणि तरुणाईचा हा अनोखा मिलाफ या लिलावात पाहायला मिळणार आहे!












Click it and Unblock the Notifications