सामना जिंकला तरी फायदाच, हरला तरीही कमाई जोरात! नीता अंबानी आणि प्रीती झिंटा IPL मधून किती कमावतात?
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना पंजाब किंग्जने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सवर मोठा विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. श्रेयस अय्यरच्या नाबाद 87 धावांच्या जोरावर पंजाबने 204 धावांचे लक्ष्य केवळ सहा चेंडू राखून गाठले. पंजाब किंग्जचा हा दुसरा फायनलमध्ये प्रवेश आहे.

सामन्याच्या निकालाने चाहत्यांच्या भावना हलवल्या असल्या तरी, फ्रँचायझी मालकांसाठी ही स्पर्धा एका वेगळ्याच पातळीवरचा 'खेळ' असतो. मैदानावर विजय किंवा पराभव झाला तरीही त्यांना कोट्यवधींचा नफा निश्चित असतो.
तिकिटविक्रीतून मोठी कमाई
आयपीएल सामन्यांत प्रेक्षकांची गर्दी ही संघ मालकांसाठी सोनेरी संधी असते. स्टेडियममध्ये सामन्यावेळी विकल्या जाणाऱ्या तिकिटांच्या उत्पन्नातून तब्बल 80 टक्के रक्कम थेट संघ मालकांच्या खात्यात जमा होते. उर्वरित 20 टक्के रक्कम स्थानिक क्रिकेट संघटना आणि स्टेडियम प्रशासनाला दिली जाते.
उदाहरणार्थ, क्वालिफायर-2 सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला, जिथे सुमारे 1.35 लाख प्रेक्षकांची बसण्याची क्षमता आहे. जरी एका तिकिटाची किंमत सरासरी 3,000 रुपये धरली, तरी एका सामन्यांतून 30 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळू शकते. हे उत्पन्न अधिक असल्यास, ते 40 कोटींपर्यंत पोहोचते.
स्पॉन्सरशिप आणि जर्सी डील्समधूनही भरघोस रक्कम
फ्रँचायझींच्या जर्सीवर असलेले विविध ब्रँड्सचे लोगो, तसेच मैदानातील होर्डिंग्ज आणि डिजिटल जाहिराती हे संघ मालकांसाठी कमाईचा मोठा स्रोत ठरतात. प्रीती झिंटा यांच्या पंजाब किंग्ज किंवा नीता अंबानी यांच्या मुंबई इंडियन्ससारख्या लोकप्रिय संघांना या स्पॉन्सरशिप डील्समधून कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळते.
याशिवाय, सामन्याच्या प्रसारण हक्कांमधूनही फ्रँचायझींना निश्चित वाटा मिळतो. बीसीसीआयने आयपीएलच्या मीडिया राइट्ससाठी विकलेले अधिकार अब्जावधी रुपयांचे असून, त्यातून प्रत्येक संघाला हंगामात 300 कोटींपर्यंत वाटा मिळतो.
व्यवसायिक यशाची खात्री
खेळाडूंना विकत घेण्यासाठी लिलावात कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या फ्रँचायझींसाठी आयपीएल ही केवळ स्पर्धा नसून एक फायद्याचा व्यवहार आहे. सामन्यांत जिंकले तरीही, किंवा हरले तरीही, प्रत्येक सामन्याचा आर्थिक नफा संघ मालकांना निश्चित मिळतो. त्यामुळेच आयपीएलचा निकाल मैदानावर काहीही असो, नीता अंबानी आणि प्रीती झिंटा यांच्यासह अन्य संघ मालकांसाठी ही स्पर्धा हमखास
नफ्याची हमी देणारी आहे.
आता 3 जून रोजी फायनलमध्ये कोणता संघ ट्रॉफी उंचावतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल, मात्र व्यावसायिक गणिताच्या कसोटीत प्रत्येक संघ मालक आधीच विजेता ठरलेला आहे!












Click it and Unblock the Notifications