IPL 2025: आयपीएलपूर्वीच धोनीने मारले चौके-छक्के; सरावात 'असा' दिसला अवतार की समोरच्याची खैर नाही
आयपीएल २०२५ लवकरच सुरु होणार आहे. या सर्वात लोकप्रिय व मोठ्या स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने तयारी सुरू केली आहे. सीएसकेचा पहिला सामना २३ मार्च रोजी मुंबई इंडियन्सशी होईल. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील या स्पर्धेसाठी तयार आहे. धोनीला पुन्हा खेळताना पाहणे हे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. धोनी आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून प्रवेश करेल. धोनीने या स्पर्धेपूर्वी सराव सुरु केला असून, त्याने सरावात मारलेले चौके-छक्के डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले आहेत. सध्या धोनीच्या प्रॅक्टीसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याचीच चर्चा सुरु आहे.

धोनीने सुरु केला सराव
आयपीएल २०२५ सुरू होण्यास एक आठवडा शिल्लक आहे. त्याआधी धोनीने त्याच्या चाहत्यांना त्याच्यातील आक्रमकतेचा टीझर दाखवला. धोनीचा सराव व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो नेटवर सराव करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये धोनी एका शॉर्ट डिलिव्हरीवर शॉट खेळताना दिसत आहे. धोनीचा हा शॉट पाहून चाहते खूप आनंदी झालेले दिसत आहेत.
The Sound of the Bat on Ball ! 🥵#MSDhoni #WhistlePodu #CSK #IPL2025
— Saravanan Hari 💛🦁🏏 (@CricSuperFan) March 14, 2025
🎥 via @ChennaiIPL pic.twitter.com/0QEN7Mtw2T
सोडले होते कर्णधारपद
धोनी सध्या ४३ वर्षांचा आहे. सध्या तो आयपीएलच्या १८ व्या हंगामात भाग घेण्यासाठी सज्ज आहे. धोनीने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तो या लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. गेल्या हंगामाच्या अगदी आधी धोनीने सीएसकेची कमान सोडली. त्याच्या नंतर ऋतुराज गायकवाडला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसके गेल्या हंगामात पाचव्या स्थानावर राहिला. प्लेऑफमध्ये हा संघ त्यावेळी स्थान मिळवू शकला नव्हता.
धोनी वरच्या फळीत खेळेल
गेल्या हंगामात धोनी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. धोनी शेवटच्या क्षणी फलंदाजीसाठी यायचा आणि काही शानदार शॉट्स खेळून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसायचा. धोनीने आयपीएल २०२४ मध्ये २२० पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आणि ५३.६७ च्या सरासरीने १६१ धावा केल्या. गेल्या हंगामात धोनी दुखापतींशी झुंजत होता असे वृत्त आहे. या हंगामात धोनी वरच्या फळीत फलंदाजी करेल अशी चाहत्यांना आशा आहे. आयपीएलच्या नियमांनुसार पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ निवृत्त झालेल्या खेळाडूला अनकॅप्ड खेळाडू मानले जाते. सीएसकेने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले. धोनीने अलिकडेच संकेत दिला होता की त्याच्यात अजूनही आणखी काही वर्षे खेळण्याची क्षमता आहे.












Click it and Unblock the Notifications