'जर तुम्हाला खेळायचे असेल तर तुम्हाला हे करावेच लागेल',सौरव गांगुलीची धोनीबद्दल प्रतिक्रिया
IPL 2025 : आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. संघाचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या सीझनमधून बाहेर पडल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2025 च्या उर्वरित सीझनसाठी संघाचा कर्णधार म्हणून धोनीचे नाव जाहीर केलं आहे.
धोनीत अजूनही षटकार मारण्याची ताकद
फ्रँचायझीच्या या निर्णयावर टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आनंद व्यक्त केला आहे. गांगुलीने म्हटलं आहे की, आता माही वेगळ्या अंदाजात दिसेल. तसेच महेंद्रसिंग धोनीत अजूनही षटकार मारण्याची ताकद आहे. त्याने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळायला हवे. धोनी जेव्हा कर्णधार असतो तेव्हा तो वेगळ्या रंगात दिसतो. चेन्नईचा पुढील सामना आज 11 एप्रिल रोजी कोलकाताविरुद्ध होईल.

दरम्यान सौरव गांगुलीने एका कार्यक्रमादरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधार पदाबद्दल भाष्य केलं आहे. पुढे बोलताना गांगुलीने म्हटलं आहे की,'मला विश्वास आहे की, जर एमएस धोनीला सीएसकेकडून खेळायचे असेल तर त्याला कर्णधारच राहावे लागेल.' कारण जेव्हा तो कर्णधार असतो, तेव्हा तो वेगळ्याच रंगात दिसतो. चेन्नई सुपर किंग्जने सलग चार सामने गमावले असताना धोनीने कर्णधारपदी पुनरागमन केलं आहे. 2023 मध्ये पाचवे विजेतेपद जिंकल्यानंतर कर्णधार म्हणून धोनीचा आज पहिला सामना कोलकाताविरुद्धअसणार आहे..
गांगुली म्हणाला की, 'धोनी अजूनही षटकार मारत आहे. गेल्या सामन्यात आपण ते पाहिलं आहे. तो आता 43 वर्षांचा आहे आणि 2005 मध्ये खेळत होता तसा तो आता खेळू शकत नाही. हे स्वाभाविक आहे. पण मला वाटतं त्याच्यात अजूनही षटकार मारण्याची ताकद आहे. त्याच्या अनुभवाच्या आणि खेळाच्या समजुतीच्या जोरावर तो सीएसकेसाठी जे योग्य आहे तो करेल, असं गांगुलीने सांगितले आहे.
आयपीएलच्या सीझनमध्ये कर्णधार म्हणून धोनीची कामगिरी खास
पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी या सीझनमध्ये फारशी काही खास राहिली नाही. या सीझनमध्ये सीएसकेने पाच सामने खेळले आहे. त्यापैकी चार सामन्यात त्यांना पराभव स्वीकारवा लागला आहे. फक्त पहिल्या सामन्यात त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केल आहे. पॉंइट टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ दोन गुणांसह नवव्या स्थानावर आहे.आयपीएलच्या सीझनमध्ये धोनीने 226 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्यापैकी त्याने आतापर्यंत 133 सामन्यांमध्ये सीएसकेला विजय मिळवून दिला आहे. कर्णधारपद भूषवताना 100 हून अधिक आयपीएल सामने जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे.












Click it and Unblock the Notifications