हरारेच्या मैदानावर आज भारताचा झिंम्बाब्वेविरुद्ध दुसरा सामना
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 13 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. झिम्बाब्वेने 8 वर्षांनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये भारताचा पराभव करून दमदार विजयाने मालिकेची सुरूवात केली.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा खेळाडू झिम्बाब्वेविरुद्ध प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पहिल्या सामन्यातील चुका सुधारुन चांगलं खेळा, अशी तंबी कर्णधार शुभमन गिलनं खेळाडूंना दिली असेल.
असा झाला होता पहिला सामना
पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. भारताकडून स्पिनर रवी बिश्नोईने चार विकेट तर अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट्स घेण्यात यश मिळवलं होतं. या दोन खेळाडूंच्या दमदार गोलंदाजीमुळे भारताने झिम्बाब्वेला 115 धावांवर रोखले. पण प्रत्युत्तरात भारतीय संघ 102 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात भारताचा 13 धावांनी पराभव झाला.
भारताला पुनरागमनाची संधी
आजच्या सामन्यात भारतीय संघाला दमदार पुनरागमनाची संधी आहे. झिम्बाब्वेमध्ये भारतीय संघाची कामगिरी यापूर्वी चांगली राहिली आहे. टीम इंडियाला अद्याप कोणत्याही टी-20 मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला नाही. 2015 साली या दोन्ही संघांमध्ये खेळलेली दोन सामन्यांची मालिका अनिर्णित राहिली. तर 2010 मध्ये भारतीय संघाने झिम्बाब्वेचा दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभव केला होता. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाला उर्वरित सामने जिंकून मालिका जिंकायची आहे.
काय सांगते हरारेची खेळपट्टी..?
हरारे स्पोर्ट्स क्लबबद्दल बोलायचे झाले, तर खेळपट्टीवर आतापर्यंत 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 23 सामने जिंकले आहेत. या खेळपट्टीवर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही चांगली मदत मिळणार आहे. अशा स्थितीत चांगली कामगिरी करणारा संघ दुसरा टी-२० सामना जिंकण्यात यशस्वी ठरेल.
असा असेल भारताचा संघ
शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद.
असा असेल झिम्बाब्वेचा संघ
तदिवनाशे मारुमणी, इनोसंट काया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डायन मेयर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदनाडे (विकेटकीपर), वेस्ली माधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.












Click it and Unblock the Notifications