IND vs NZ: अश्विनने न्यूझीलंडला घाम फोडला! WTC इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला
India vs New Zealand, 2nd Test: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. पुण्यातील न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अश्विनने दुसरी विकेट घेतल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (WTC) त्याच्या विकेट्सची संख्या 188 पर्यंत पोहचली आहे नेली.
दरम्यान रविचंद्रन अश्विनने डब्ल्यूटीसीमध्ये 187 विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर नॅथन लायनला मागे टाकले आहे. पहिल्या दिवशी त्याने टॉम लॅथम आणि विल यंग यांना बाद करत 39 सामन्यांत 188 बळी घेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

आर अश्विनची विक्रमी कामगिरी
अश्विनने 43 कसोटीत 187 विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 42 सामन्यांत 175 बळी घेत तिसऱ्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह या यादीत सातव्या स्थानावर आहे. बुमराहने 30 सामन्यांत 124 बळी घेतले आहेत. अश्विनची ही कामगिरी ऑफस्पिनर म्हणून त्याची क्षमता दर्शवते.
अश्विनची कसोटी कारकीर्द
आपल्या शानदार कसोटी कारकिर्दीत अश्विनने 104 सामन्यांत 531 विकेट घेतल्या आहेत आणि त्याची सरासरी 24 पेक्षा कमी आहे. अश्विन हा अनिल कुंबळेनंतर कसोटीत भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याचे योगदान गोलंदाजीपलीकडेही आहे. त्याने आतापर्यंत 26.44 च्या सरासरीने 3,438 धावा केल्या आहेत. ज्यात सहा शतके आणि चौदा अर्धशतकांचा समावेश आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने सामन्याची सुरुवात झाली. पहिल्या दिवसाच्या खेळात वृत्त लिहेपर्यंत अश्विनने तीन महत्त्वपूर्ण बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. या महत्त्वाच्या कसोटी सामन्यात त्याच्या कामगिरीने भारताचा भक्कम पाया रचला. सध्या न्यूझीलंडची धावसंख्या 75 षटकात 8 विकेट गमावून 242 धावा आहे












Click it and Unblock the Notifications