IND Vs WI यशस्वी जैस्वालने रचला इतिहास! 23 व्या वर्षी महान फलंदाज ब्रॅडमन, सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
Ind vs wi Yashasvi Jaiswal Hits 7th Test Century : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या २३ वर्षीय फलंदाज यशस्वी जैस्वालची मोठी चर्चा आहे, त्याने आपल्या बॅटने जोरदार कामगिरी करतर कसोटी शतके मोजायला लावली आहेत! हा आहे 'यशस्वी' जैस्वाल.. दिल्लीतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सातवे शतक झळकावत जैस्वालने एक असा 'रेकॉर्ड' केला आहे, जो डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर आणि गॅरी सोबर्स वगळता इतर कोणत्याही महान फलंदाजाला आपल्या २४ व्या वाढदिवसापूर्वी साधता आला नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या 'एलीट क्लब'मध्ये प्रवेश करणारा जैस्वाल हा आजच्या पिढीतील सर्वात मोठा फलंदाज बनला आहे. जगातल्या दिग्गजांनाही मागे टाकणाऱ्या या तरुण 'रनमशीन'चा नेमका विक्रम काय आहे, हे सविस्तर जाणून घेऊया..

आज १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने आपले सातवे कसोटी शतक झळकावून एक नवा इतिहास रचला आहे. या दमदार शतकी खेळीमुळे, यशस्वी जैस्वालने जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे.
यशस्वी जैस्वालच्या कामगिरीचे पाच प्रमुख मुद्दे
१. २४ वर्षांपूर्वी ७ कसोटी शतके
यशस्वी जैस्वालने आपला २४ वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच सात कसोटी शतके पूर्ण केली आहेत. या विशेष यादीत तो जावेद मियांदाद, ग्रेम स्मिथ, ॲलिस्टर कुक आणि केन विल्यमसन यांच्यासोबत सामील झाला आहे.
२. महान खेळाडूंनाही मागे टाकले
या कामगिरीमुळे, २४ वर्षांपूर्वी सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे केवळ डॉन ब्रॅडमन (१२), सचिन तेंडुलकर (११) आणि गॅरी सोबर्स (९) हेच आहेत.
३. जगात सर्वोत्तम सलामीवीर (२०२२ पासून)
२०२२ मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून, जैस्वालने स्वतःला जगातील अव्वल सलामी फलंदाजांपैकी एक म्हणून सिद्ध केले आहे. या कालावधीत, जागतिक क्रिकेटमध्ये इतर कोणत्याही सलामी फलंदाजाने जैस्वालपेक्षा जास्त शतके (७) केलेली नाहीत. इंग्लंडचा बेन डकेट ४ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
४. भारतीय दिग्गजांच्या पंक्तीत स्थान
यशस्वी जैस्वालने एका कॅलेंडर वर्षात किमान तीन कसोटी शतके झळकावण्याची कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. भारतीय सलामी फलंदाजांमध्ये सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या दिग्गजांनीच ही कामगिरी एकापेक्षा जास्त वेळा केली आहे.
५. कसोटीतील प्रभावी कामगिरी
आतापर्यंत खेळलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये जैस्वालने सात शतके आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने जवळपास ५० च्या सरासरीने धावा केल्या आहेत, ज्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप पक्की केली आहे.












Click it and Unblock the Notifications