IND vs NZ Final: विराटकडे सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडण्याची संधी, 95 धावा करताच इतिहास रचेल
IND vs NZ Final: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी सुरु झाला आहे. दोन्ही संघांमध्ये आज 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने गट फेरीत न्यूझीलंड संघाचा 44 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एक ही सामना गमावला नाही.
दरम्यान असे असूनही टीम इंडिया अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हलके घेण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या कामगिरीवर असेल जो आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्तम फॉर्ममध्ये आहे. ग्रुप स्टेज सामन्यात कोहली न्यूझीलंडविरुद्ध मोठी खेळी करू शकला नसला तरी एकदिवसीय सामन्यांमध्ये किवी संघाविरुद्ध त्याचा रेकॉर्ड खूपच चांगला असल्याचे दिसून येते. त्याच वेळी विराट कोहलीला अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडण्याची संधी असेल.

95 धावा करताच विराट कोहली इतिहास रचेल
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, सचिनने किवी संघाविरुद्धच्या 42 एकदिवसीय सामन्यांच्या 41 डावांमध्ये फलंदाजी करताना 46.05 च्या सरासरीने एकूण 1750 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 8 अर्धशतके आहेत.
विराट कोहलीने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध 32 एकदिवसीय सामने खेळला आहेत आणि 32 डावांमध्ये फलंदाजी करताना 57.10 च्या सरासरीने 1656 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत जर कोहलीने अंतिम सामन्यात आणखी 95 धावा केल्या तर तो न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. कोहलीने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध 6 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 72.33 च्या सरासरीने 217 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट आणि रचिन रवींद्र यांच्यात जोरदार लढाई पाहायला मिळत आहे. आतापर्यंत रचिनने 2 शतकी खेळींसह एकूण 226 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
सचिन तेंडुलकर - 1750 धावा
विराट कोहली - 1656 धावा
वीरेंद्र सेहवाग - 1157 धावा
मोहम्मद अझरुद्दीन - 118 धावा
सौरव गांगुली - 1079 धावा












Click it and Unblock the Notifications