IND vs NZ T20: आज नागपुरात थरार! टॉस किती वाजता? कशी आहे खेळपट्टी? जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड
IND vs NZ 1st T20 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेचा बिगुल आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर वाजणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ 'किवीं'च्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मालिकेतील पहिला सामना नेहमीच महत्त्वाचा असतो, त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. चाहत्यांच्या मनात मात्र टॉस आणि सामन्याच्या वेळेबद्दल उत्सुकता आहे.

आजच्या सामन्याचा टॉस आणि सामन्याची वेळ
- टॉसची वेळ: संध्याकाळी ६:३० वाजता (IST)
- सामना सुरू होण्याची वेळ: संध्याकाळी ७:०० वाजता (IST)
- ठिकाण: विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियम, जामठा, नागपूर
खेळपट्टीचा अहवाल (Pitch Report)
नागपूरची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी नेहमीच नंदनवन मानली जाते. चेंडूला येथे चांगली पकड आणि वळण मिळण्याची शक्यता आहे. मात्र, संध्याकाळच्या सामन्यात 'दव' हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक ठरू शकतो. दुसऱ्या डावात दव पडल्यास चेंडू ओला होतो, ज्यामुळे फिरकीपटूंना गोलंदाजी करणे आणि चेंडूवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. अशा परिस्थितीत फलंदाजी करणे सोपे होते. त्यामुळे, जो कर्णधार नाणेफेक जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्ड (T20 Head-to-Head)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात T20 क्रिकेटमध्ये नेहमीच 'काँटे की टक्कर' पाहायला मिळाली आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार..
- एकूण सामने: २५
- भारत विजयी: १२
- न्यूझीलंड विजयी: १०
- टाय/निकाल नाही: ३
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, दोन्ही संघ एकमेकांना सहज हरवू शकत नाहीत, या संघात काट्याची टक्कर होते, त्यामुळे आजचा सामनाही रोमांचक होण्याची पूर्ण शक्यता आहे.
ईशान किशनवर असणार विशेष लक्ष
कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. तब्बल २ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या ईशानकडून नागपूरच्या मैदानावर एका स्फोटक खेळीची अपेक्षा असेल.
दोन्ही संघांचे खेळाडू
भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, अभिषेक शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड संघ:
मिचेल सँटनर (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), टिम रॉबिन्सन, रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, काइल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी, मॅट हेन्री, बेवन जेकब्स, क्रिस्टियन क्लार्क, झॅक फॉक्स.












Click it and Unblock the Notifications