Vaibhav Suryavanshi: फायनलमध्ये वैभवचं वादळ! अवघ्या 55 चेंडूत ठोकलं शतक; मोडला 'बेबी एबी'चा रेकाॅर्ड
IND vs ENG U19 Wolrdcup Vaibhav Suryavanshi Century : क्रिकेटच्या पंढरीत आज एका नवीन ताऱ्याचा उदय झाला आहे. अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर वैभवने केवळ ५५ चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याच्या या तुफानी खेळीमुळे भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.

'राडा' फक्त ५५ चेंडूत: वैभव सूर्यवंशीने मैदानात माजवला हाहाकार!
हरारेच्या मैदानावर आज 'टीम इंडिया'च्या एका वादळाने इंग्लंडच्या गोलंदाजीचे अक्षरशः पापुद्रे सोलले. वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर मैदानात खऱ्या अर्थाने 'राडा' घातला. वैभवने बुद्धिमत्ता आणि आक्रमकता यांचा असा काही मेळ घातला की, त्याने कोणताही अनावश्यक धोका न पत्करता १८१.८२ च्या तुफानी स्ट्राईक रेटने अवघ्या ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
८० चेंडूत १७५ धावा
या ऐतिहासिक शतकी खेळीदरम्यान वैभवने १६ वेळा चेंडू सीमापार धाडला; ज्यामध्ये ८ उत्तुंग षटकार आणि ८ खणखणीत चौकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीने स्टेडियममधील प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यानंतर वैभवने आपल्या १७५ धावा अवघ्या ८० चेंडूत पुर्ण केल्या व विश्वचषकातील सर्वात खास खेळी केली.
'बेबी एबी'चा विक्रम मोडला: वैभव बनला नवा 'सिक्सर किंग'
वैभवने आज केवळ शतकच ठोकले नाही, तर १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासातील एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या खेळीसह वैभव सूर्यवंशी आता अंडर-१९ विश्वचषकाच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार (२०)* मारणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा "बेबी एबी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रुईसच्या नावावर होता, ज्याने २०२२ च्या हंगामात १८ षटकार मारले होते. वैभवने ब्रुईसचा हा विक्रम मोडीत काढत जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.
डेवाल्ड ब्रेविसचा विक्रम मोडीत
या ऐतिहासिक खेळीदरम्यान वैभवने दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसचा (ज्याला 'बेबी एबी' म्हटले जाते) मोठा विक्रम मोडला. एका अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मान आता वैभवकडे गेला आहे.
- वैभव सूर्यवंशी (भारत): २०* षटकार (२०२६)
- डेवाल्ड ब्रेविस (दक्षिण आफ्रिका): १८ षटकार (२०२२)
- फिन ॲलन (न्यूझीलंड): १८ षटकार (२०१६-१८)
अशी संपली ऐतिहासिक खेळी
२६ व्या षटकात इंग्लंडचा गोलंदाज मॅनी लम्सडेनने वैभवला बाद केले. लम्सडेनच्या चेंडूवर लॅप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू वैभवच्या ग्लोव्हजला लागून यष्टीरक्षक थॉमस रेवच्या हातात गेला. जरी वैभव १७५ धावांवर बाद झाला असला तरी, त्याने क्रिकेट विश्वाला आपल्या आक्रमक फलंदाजीची दखल घेण्यास भाग पाडले आहे.












Click it and Unblock the Notifications