टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव आजपासून राजकीय इनिंगला सुरुवात करणार, आज होणार पक्षप्रवेश
Kedar Jadhav : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव आजपासून आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात करणार आहेत. केदार जाधव आज दुपारी 3 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केदार जाधव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश आहे. मात्र भाजप आणि जाधव यांनी अद्याप याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही.
दरम्यान केदार जाधवने मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर केदारच्या राजकारणामध्ये प्रवेश करणार अश्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द
केदार जाधव एक उत्कृष्ट फलंदाज आणि पार्टटाइम गोलंदाजीसाठी ओळखला जातो. 2017 मध्ये पुण्यात इंग्लंडविरुद्धची त्याची 120 धावांची खेळी ही त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक होती. या सामन्यात त्याने विराट कोहलीसोबत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
26 मार्च 1985 रोजी पुणे महाराष्ट्र येथे जन्मलेल्या क्रिकेटपटू केदार जाधवचे पूर्ण नाव केदार महादेव जाधव आहे. जुलै 2014 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. केदार जाधव याने 2024 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. केदारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही.
रणजी क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 पेक्षा जास्त धावा
भारतासाठी 73 एकदिवसीय सामने खेळणारा केदार जाधव हा स्थानिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्रच्या संघाकडून खेळत आहे. रणजीमध्ये त्याचे योगदान खूप चांगले राहिले आहे. 2013-14 च्या रणजी हंगामात त्याने 1,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ज्यात एक त्रिशतक (327 धावा) समाविष्ट होते.
आयपीएलमध्ये सहभाग
आयपीएलमध्ये केदार जाधवने 4 फ्रँचायझींसोबत सामने खेळले आहेत. तो दिल्ली डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा भाग राहिला आहे. तो एक संकटमोचक खेळाडू म्हणूनही ओळखला जातो.
3 जून 2024 रोजी निवृत्तीची घोषणा
- भारतासाठी 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1,389 धावा आणि 27 विकेट्स.
- इंग्लंडविरुद्ध 120 धावांची तुफानी खेळी.
- 2013-14 हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा.
- देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्रिशतक.
- 3 जून2024 रोजी त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.












Click it and Unblock the Notifications