प्रदार्पणातच हर्षित राणाचा 'हा' ऐतिहासिक पराक्रम; इंग्लंडचा डाव २४८ धावांत गुंडाळला
कसोटी, वनडे आणि टी-२० अशा क्रिकेटच्या सर्व फाँर्मेटमध्ये पहिल्याच सामन्यात, तीन किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा हर्षित राणा हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. २३ वर्षीय हर्षित राणाने आज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सात षटकांत ५३ धावा देत तीन गडी बाद केले. त्यात त्याने एक षटक निर्धावही टाकलं. एका षटकात डकेटने हर्षितला २६ धावा ठोकल्यामुळे त्याचा इकोनाँमी रेट बिघडला खरा, मात्र त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम आपल्या नावे केला.

कशी झाली इंग्लंडची फलंदाजी
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडने सर्व गडी गमावून २४८ धावा केल्या. भारताला विजयासाठी २४९ धावांचे टार्गेट दिले. आजच्या सामन्यात विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकला नाही. यशस्वी जैसवाल पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळत असल्याने त्याच्या कामगिरीकडे सर्वांचा नजरा आहेत. फिलीप साल्ट व बेन डकेट यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी ७५ धावांची भागिदारी केली. मात्र ही जोडी फुटल्यावर इंग्लंडचा डाव गडगडला. साँल्ट ४३ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर बेन डकेटला राणाने तंबूत पाठवलं. राणाने एकाच षटकांत दोन विकेट घेत इंग्लंडला बॅकफुटला आणलं.
गोलंदाजांनी केली कमाल
हर्षित राणाने आजच्या सामन्यांत चांगली गोलंदाजी केली. तो थोडा महागडा ठरला असला तरी, त्याने तीन विकेट घेतल्या. रविंद्र जडेजानेही आपल्या फिरकीची जादू दाखवली. जडेजाने नऊ षटकांत २६ धावा देत तीन गडी बाद केले. मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. इंग्लंडकडून जोस बटलर व जेकोब बेथेलने अर्धशतकी खेळी केली.
हर्षित राणाचा पराक्रम
हर्षित राणाने इतिहास रचला आहे. तो भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणात तीन किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. या २३ वर्षीय वेगवान गोलंदाजाने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्यात ४८ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर, इंग्लंडविरुद्ध पुण्यात त्याने पहिल्याच टी-२० सामन्यात ३३ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. आता त्याची तीक्ष्ण गोलंदाजी एकदिवसीय सामन्यांमध्येही दिसून आली. नागपूरमध्ये एकदिवसीय पदार्पण करताना त्याने तीन बळी घेण्यात यश मिळवले.
हे फलंदाज ठरले हर्षितचे बळी
हर्षित राणाचा त्याच्या एकदिवसीय पदार्पणातील पहिला बळी इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट (३२) होता. राणाने त्याला यशस्वी जयस्वालकडून झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या मोठ्या धक्क्यातून विरोधी संघ सावरण्यापूर्वीच, त्याने षटकातील शेवटच्या चेंडूवर हॅरी ब्रूक (०) ला राहुलकडून झेलबाद केले. सामन्यादरम्यान त्याचा तिसरा बळी अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन (०५) होता. त्याने लिव्हिंगस्टोनला राहुलकडून झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हर्षित राणाने त्याच्या एकदिवसीय पदार्पणाच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत तीन विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. पण सामन्यादरम्यान तो खूप महागडा ठरला. त्याने संघासाठी एकूण सात षटके टाकली. दरम्यान, त्याने ७.५७ च्या इकॉनॉमी रेटने ५३ धावा दिल्या, जे खूप जास्त आहे.












Click it and Unblock the Notifications