ऑस्ट्रेलियाने 'गेम' केला; या अष्टपैलू खेळाडूला दिली एन्ट्री, टीम इंडियाचे टेन्शन वाढले?
भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी-२०२५ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा सामना उद्या (मंगळवारी) ऑस्ट्रेलियाशी होईल. आयसीसी स्पर्धेतील या दोन देशांची लढत पाहिली तर, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला कायम त्रास दिल्याचा इतिहास आहे. उद्याच्या मॅचमध्येही ऑस्ट्रेलियाने एका स्टार प्लेअरला संघात स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलियाची ही रणनिती भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॉनोलीचा संघात समावेश
ऑस्ट्रेलियाने जखमी मॅथ्यू शॉर्टच्या जागी कूपल कॉनोलीचा समावेश केला आहे. भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने हा बदल केला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॅथ्यू शॉर्ट दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो बाद फेरीतून बाहेर पडला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने २१ वर्षीय कूपर कॉनोली या डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान दिले.
कोण आहे कॉनोली
कूपर कॉनोली हा डावखूरा फलंदाज व डावखूरा फिरकी गोलंदाज आहे. त्याच्याकडे आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. ज्यामध्ये तीन एकदिवसीय सामने आहेत. शॉर्टची ऑफ-स्पिन क्षमता लक्षात घेता, कूपरला थेट संघात प्रवेश मिळू शकतो. दुबईची खेळपट्टी पाहता, येथे स्पिनर्सला मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात भारतानेही फिरकीच्या जोरावर विजय मिळवला होता. त्यामुळे कॉनोली भारतीय संघाची डोकेदुखी वाढवू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.
ऑस्ट्रेलिया अजून एक डाव खेळणार?
मॅथ्यू शॉर्टऐवजी संघ व्यवस्थापन जॅक फ्रेझर मॅकगर्कला स्थान देऊ शकते. तो एक चांगला सलामीवर आहे. संघाला एखाद्या फिरकी गोलंदाजाची आवश्यकता वाटत असेल तर ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन तन्वीरलाही संघाला संधी देऊ शकते. मिचेल मार्शच्या पर्यायी खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आलेला जॅक फ्रेझर मॅकगर्क गेल्या सात एकदिवसीय सामन्यांमध्ये संघर्ष करत आहे. परंतु निवडकर्त्यांना अजूनही त्याच्यावर विश्वास आहे. मॅकगर्कला संधी मिळाली नाही, तर मधल्या फळीतील कोणीतरी डावाची सुरुवात करण्यासाठी येऊ शकते.
कसा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ?
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जॅक फ्रेझर मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा आणि अॅडम झांपा.












Click it and Unblock the Notifications