Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तान संघातून बाबर-रिझवान आऊट; जाणून घ्या कोण देणार भारताला आव्हान!
Asia Cup 2025 : आशिया कप 2025 साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यातील सर्वात लक्षणीय बदल म्हणजे दोन अनुभवी खेळाडू, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना वगळण्यात आले आहे. या निर्णयाने अनेक क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सलमान आगा यांच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

बाबर आणि रिझवानला वगळण्याचे कारण
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे पाकिस्तानच्या टी-२० संघातून बाहेर पडतील अशी चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होती. नुकत्याच बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतही या दोघांचा संघात समावेश नव्हता. संघातून त्यांना वगळण्याचे मुख्य कारण त्यांची संथ फलंदाजी असल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2025 च्या हंगामात, बाबरने पेशावर झल्मीसाठी खेळताना 128.57 च्या स्ट्राइक रेटने 288 धावा केल्या, तर मोहम्मद रिझवानने मुलतान सुल्तान्ससाठी 139.54 च्या स्ट्राइक रेटने 367 धावा केल्या, ज्यात एक शतकही समाविष्ट आहे. त्यांचे हे आकडे जरी चांगले वाटत असले तरी, टी-20 क्रिकेटमधील वेगाने वाढणाऱ्या अपेक्षांच्या तुलनेत ते पुरेसे नाहीत. या दोघांनी त्यांचा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2024 मध्ये खेळला होता.
टी-20 विश्वचषकाची तयारी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामागे आगामी टी-20 विश्वचषकाची तयारी हे एक मोठे कारण आहे. बोर्ड नवीन आणि युवा खेळाडूंना संधी देऊन संघाला एक नवीन आकार देण्याचा प्रयत्न करत आहे. बाबर आणि रिझवान यांना आता टी-२० फॉरमॅटसाठी संघात क्वचितच सामील केले जाईल, असे संकेत मिळत आहेत.
आशिया कपच्या आधी पाकिस्तानचा संघ यूएईमध्ये एक त्रिकोणी मालिका खेळणार आहे, ज्यात यूएई आणि अफगाणिस्तानचे संघ सहभागी होतील. ही मालिका सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल आणि त्यानंतर 9 सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होईल.
आशिया कप आणि तिरंगी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ
कर्णधार: सलमान आगा, इतर खेळाडू: अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, साहिबजादा फरहान, सैम अय्युब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मोकीम.












Click it and Unblock the Notifications