'त्यांना' वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे... बाबा सिद्धीकीच्या हत्या प्रकरणात मुलगा झिशानचा आरोप
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आता अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. या दोन्ही गंभीर प्रकारानंतर आज आ. झिशान सिद्धीकी यांनी पत्रकार परिषद घेत, काही महत्त्वाच्या प्रश्नांना हात घातला. पोलिस तपासाबाबत आपण समाधानी नसल्याचे झिशान सिद्धीकी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. शिवाय या प्रकरणात आता आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले झिशान सिद्धीकी?
पत्रकार परिषदेत झिशान यांनी वडील बाबा सिद्धीकी यांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "मी काही बिल्डरांची नावं पोलिसांना दिली आहेत. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ती नावे जाहीर होतीलच. त्यामुळे आत्ता त्या नावांबद्दल बोलणं योग्य नाही. पोलीस त्यांच्या स्टेटमेंटनुसार तपास करत नाहीत, हे मात्र नक्की. कोर्टात जज सुद्धा पोलिसांना हेच विचारणार आहे. मी पोलिसांनी पुरावे दिलेत, मात्र तरीही बिल्डरची चौकशी झाली नाही. असं असेल तर लोकांचा कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास उडेल, असंही झिशान यांनी स्पष्ट केलं.
सैफवरील हल्ल्याबाबत बोलले
या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत झिशान यांना विचारले. त्यावर ते म्हणाले, ज्या बांद्र्यात माझा जन्म झाला. ज्या बांद्र्यात मी माझं बालपण घालवलं. ते वांद्रे आणि आत्ताच वांद्रे यात फरक आहे. वांद्रे आता तेवढं सुरक्षित राहिलेलं नाही. बिश्नोई गँगचे नाव घेऊन सगळे प्रश्न सुटत नाहीत. पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने करावा, असं झिशान यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
फडणवीसांची घेणार भेट
वडिलांच्या हत्येच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केल्यावर आपण गहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार का, असा प्रश्न पत्रकारांनी झिशान यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस हे माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते. वडिलांसोबत घटना घडल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रुग्णालयात आले होते. तेव्हा ते म्हणालेले की, झिशान तू चिंता करु नको. तुझे बाबा माझे मित्र होते. मी जे प्रश्न पोलिसांना विचारतोय, उद्या ते तेच प्रश्न पोलिसांना विचारणार आहेत. निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. बिल्डरांची चौकशी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मी मागितली आहे, लवकरच ती मिळेल" असं झिशान सिद्दीकी म्हणाले.












Click it and Unblock the Notifications