दर दोन तासाला कशी येते मतदानाची टक्केवारी? तुम्हीही पाहू शकता घरबसल्या...
Maharashtra Assembly Election 2024- महाराष्ट्र विधानसभेसाठी आज बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदान सुरु झाले आहे. दर दोन तासांनी किती टक्के मतदान झाले याची अधिकृत आकडेवारी जाहिर होते. मात्र हे तुम्हालाही तुमच्या मोबाईल समजते. हे तु्म्हाला माहित आहे का..? मतदानाची टक्केवारी दिवसभर कशी समजते..? कशी असते ही प्रक्रिया..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात...

वोटर टर्नआऊट अँप
भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून वोटर टर्नआऊट ॲप तयार केलेले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोर व ॲपल स्टोर वर अथवा आयोगाच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे. कोणीही डाऊनलोड करुन त्याचा उपयोग करु शकतो. यावर मतदानाच्या दिवशी सकाळी 9 नंतर दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी जाहीर करण्यात येते.
ॲप डाऊनलोड करण्याच्या लिंक
मतदानाची प्रत्यक्ष टक्केवारी आणि ॲपवर दिसत असलेली टक्केवारी यामध्ये थोडाफार फरक असू शकतो, हे निवडणूक आयोगाने यापूर्वीच सांगितले आहे. या ॲपवर राज्य, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ यातील अंदाजित टक्केवारी उपलब्ध होते. हे ॲप https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN आणि https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882 या लिंकवर डाऊनलोड करु शकता.
दर दोन तासांनी मिळते टक्केवारी
मतदानाच्या दिवशी मतदान सकाळी सात वाजता सुरु होते. त्यानंतर दर दोन तासांप्रमाणे मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजताची अंदाजित टक्केवारी बघता येते. काही मतदान केंद्रावर संध्याकाळी 6 वाजण्याच्या आत म्हणजे मतदानाची वेळ संपण्याच्या आत मतदान केंद्रांवर दाखल झालेल्या मतदारांना टोकन देऊन सर्वांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान चालू राहते. काही मतदान केंद्रांवर अगदी रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालू राहते. अगदी शेवटचं मतदान झाल्यानंतरही एकत्रित आकडेवारी पाहता येते.
मतदानानंतर येते एकत्रित टक्केवारी
दूरध्वनी संदेशानुसार घेतलेल्या माहितीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत पुन्हा एकदा अंदाजित टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी Encore ह्या भारत निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरद्वारे वोटर टर्नआऊट ॲप वर जाहीर करतात. ही जाहीर करण्यात आलेली टक्केवारी "Close of Poll" म्हणजे मतदान संपल्यानंतरची अंदाजित टक्केवारी असते. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण आकडेवारीची माहिती घेऊन खात्री केल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होवून मतदानाची अंतिम टक्केवारी वोटर टर्नआऊट ॲप वर पाहता येते. त्याला "end of poll" अंदाजित टक्केवारी म्हणतात. यासाठी "मतदानाच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी रात्री" ही समय मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे.
का वाढते मतदानाची टक्केवारी
वोटर टर्नआऊट ॲपवर मतदानाच्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दिसणारी अंतिम टक्केवारी ही मतदान यंत्रावरील मतदानाची टक्केवारी असते. त्यामध्ये Election Duty Certificate (EDC) मतदारांनी मतदान यंत्रात केलेल्या मतदानाची संख्या समाविष्ट असते. त्याबाबतची नोंद संबंधित केंद्राध्यक्षांने डायरीत घेवून त्याची माहिती मतदान केंद्रातील प्रतिनिधींना दिलेली असते. पोस्टल मतदानाची संख्या नंतर त्यात समाविष्ट केली जाते. त्यामुळे अनेकदा ही टक्केवारी वाढते.












Click it and Unblock the Notifications