पुण्यात भाजपचा 'महा'विजय! आता महापौर कोण? 'ही' ३ नावे चर्चेत; पाहा काय आहे भाजपची रणनीती
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत यश मिळवत ११९ जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना (अजित पवार आणि शरद पवार गट) या निवडणुकीत मोठा फटका बसला असून, त्यांना मिळून केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपच्या या एकहाती सत्तेनंतर आता पुण्याचा 'पुढचा महापौर' कोण होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजपची रणनीती आणि संभाव्य चेहरे
बहुमताचा आकडा सहज पार केल्यामुळे भाजपमध्ये आता महापौरपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. सध्या राजकीय वर्तुळात तीन महत्त्वाची नावे आघाडीवर आहेत.
- गणेश बिडकर: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी सभागृह नेते म्हणून गणेश बिडकर यांचा दांडगा अनुभव आहे. शहरात अनेक ठिकाणी त्यांच्या विजयाचे आणि भावी महापौरपदाचे बॅनर झळकल्याने त्यांच्या नावाची चर्चा सर्वात जास्त आहे.
- धीरज घाटे: पुणे शहराध्यक्ष म्हणून धीरज घाटे यांनी संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांचे संघटन कौशल्य पाहता, पक्ष त्यांना या मानाच्या पदाची संधी देऊ शकतो.
- योगेश मुळीक: माजी आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू म्हणून त्यांची ओळख आहे. जगदीश मुळीक यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षादेशामुळे थांबावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर मुळीक परिवाराला न्याय देण्यासाठी योगेश मुळीक यांच्या नावाचा प्रबळ दावेदार म्हणून विचार होऊ शकतो.
आरक्षणाच्या सोडतीवर ठरणार समीकरणे
भाजपने जरी बहुमत मिळवले असले, तरी महापौरपदाची खुर्ची कोणाकडे जाणार हे 'आरक्षण सोडती'वर अवलंबून असेल. निवडणूक आयोगाकडून लवकरच महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.
महत्त्वाचा मुद्दा: महापौरपद महिलेसाठी राखीव सुटणार की पुरुषासाठी? तसेच ते अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी की सर्वसाधारण प्रवर्गासाठी असेल, हे आरक्षण सोडतीनंतरच स्पष्ट होईल. जर हे पद 'सर्वसाधारण' (Open) प्रवर्गासाठी सुटले, तर वरील तिन्ही नावांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळेल.
भाजपने पुण्यात राष्ट्रवादीला अक्षरशः धूळ चारली असून, आता विकासाच्या मुद्द्यावर शहराची धुरा कोणाच्या हाती सोपवली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications