26/11चे नायक आता महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक! कोण आहेत सदानंद दाते जाणून घ्या कारकीर्द अन् कामगिरी
Who is sadanand date new maharashtra dgp : महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे नवे प्रमुख म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला ३ जानेवारी रोजी निवृत्त होत असून, त्यांच्या जागी १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) म्हणून धुरा सांभाळतील. त्यांचा कार्यकाळ पुढील दोन वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे.

२६/११ चे 'रिअल हिरो': अजमल कसाबचा केला होता सामना
सदानंद दाते यांचे नाव घेताच २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्यांचे शौर्य डोळ्यासमोर उभे राहते. त्यावेळी दाते हे मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. दहशतवाद्यांनी कामा हॉस्पिटलवर हल्ला केल्याची माहिती मिळताच, ते आपल्या छोट्या टीमसह तिथे पोहोचले.
राष्ट्रपती पोलिस शौर्यपदकाचे मानकरी
मीडिया रिपोर्टनुसार, अजमल कसाब आणि अबू इस्माईल या दोन क्रूर दहशतवाद्यांनी हॉस्पिटलमध्ये लिफ्ट ऑपरेटरला मानवी ढाल बनवले होते. दाते यांनी जिवाची पर्वा न करता त्यांच्यावर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे दाते यांच्या डोळ्यांना, घशाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. कामा रुग्णालयात महिला आणि मुलांचे जीव वाचवल्याबद्दल दाते यांना राष्ट्रपती पोलिस पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते, हा त्यांच्या या अतुलनीय धैर्यासाठीचा सन्मान होता.
प्रदीर्घ आणि प्रगल्भ कारकीर्द
सदानंद दाते यांचा अनुभव केवळ राज्य पोलीस दलापुरता मर्यादित नाही, तर त्यांनी केंद्रातही महत्त्वाची पदे भूषवली आहेत:
NIA प्रमुख
या नियुक्तीपूर्वी ते 'राष्ट्रीय तपास यंत्रणा' (NIA) या देशातील सर्वोच्च दहशतवादविरोधी तपास संस्थेचे महासंचालक होते.
महाराष्ट्र ATS प्रमुख
सदानंद दाते यांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (ATS) नेतृत्व केले आहे. त्यांची कारकीर्द आठवणीत राहील अशी आहे.
मीरा-भाईंदर पोलिस आयुक्त
सदानंद दाते यांनी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पहिले आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
दोन वर्षांचा निश्चित कार्यकाळ
राज्य सरकारने सदानंद दाते यांची नियुक्ती करताना त्यांना दोन वर्षांचा निश्चित कार्यकाळ दिला आहे. ते पुढील वर्षी डिसेंबरमध्ये वयाची ६० वर्षे पूर्ण करत असले, तरी नियमानुसार त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत राहू शकतात, केंद्रीय लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या तीन नावांपैकी दाते यांच्या नावावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.












Click it and Unblock the Notifications