कराडच्या फेक एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर धनंजय मुंडेंनी दिली? करुणा शर्माचा खळबळजनक दावा
बीड येथील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी वाल्मिक कराड याचा बनावट एन्काऊंटर करण्यासाठी आपल्याला कोट्यवधी रुपयांची ऑफर मिळाल्याचा दावा केला. कासले यांच्या दाव्यानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातून विविध प्रतिक्रीया येऊ लागल्या. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा माणूस विक्षिप्त असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी कासले यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना खळबळजनक दावा केला.

काय म्हणाले होते कासले?
वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे. मात्र कराडला मदत केलेल्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यातील सायबर पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी एक मोठा दावा केला. वाल्मिक कराडचा बनावट एन्काउंटर करण्यासाठी आपल्याला पाच कोटींपासून ५० कोटींपर्यंतची ऑफर होती, असा व्हिडीओ कासले यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडीओनंतर एकच खळबळ उडाली.
करुणा शर्मा यांचा दावा
या व्हिडीओनंतर करुणा शर्मा यांनीही कासले यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. दारुच्या नशेत माणूस खरं बोलतं असं म्हणत करुणा शर्मा म्हणाल्या की, "रणजीत कासले हे पोलीस अधिकारी आहेत. ते खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या सुपारीची बाब खरी असू शकते." असे मत करुणा शर्मा यांनी व्यक्त केले.
१०० कोटी देऊ शकतात
करुणा शर्मा यांनी या प्रकरणात थेट धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, "धनंजय मुंडे यांचे अनेक काळे कारनामे वाल्मिक कराड याला माहिती आहेत. त्यामुळेच त्याला संपवण्यासाठी प्रयत्न असू शकतो. एन्काऊंटरसाठी देऊ केलेली ५ कोटींची रक्कम ही तुलनेने खूप कमी आहे. हे लोक अशी कामं करून घेण्यासाठी १०० कोटी रुपये सुद्धा देऊ शकतात," असा गंभीर दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
कासले यांनी केलेल्या आरोपाबाबत चौकशी करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण निवेदन देणार आहोत. तसेच, कासलेला पुन्हा त्याच्या खात्यात नोकरी मिळवून देण्यासाठी देखील अर्ज करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications