आज रात्रीपर्यंत दिल्लीत या! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा खासदारांना 'हा' आदेश
Vice Presidential Election 2025 Update : देशातील महत्वपूर्ण अशा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अगदी तोंडावर आली असून दोनच दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या अनुशंगाने राजकीय पक्ष कामाला लागले असून येत्या ९ सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाने आपल्या सर्व खासदारांना आज ७ सप्टेंबर रोजी रात्रीपर्यंत दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उमेदवार आहेत, तर इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान निवडणुकीच्या आधी दोन दिवसापुर्वी आता राजकीय उलथापालथीला वेग आला आहे.

रविवारी रात्रीच शिवसेना खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश
महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत बोलावली आहे. तसेच आजच रात्री, रविवारी सर्व खासदारांना दिल्लीत येण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत.
शिवसेनेने आधीच जाहीर केला पाठींबा
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयासाठी शिवसेना पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची महत्वपूर्ण बैठक सोमवार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बोलावली आहे. उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना जास्तीतजास्त मतांनी निवडून आणण्यासाठी शिवसेना आग्रही आहे.
श्रीकांत शिंदेवर शिवसेनेची जबाबदारी
शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे या निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवून असून मतदान कसे करावे, काय काय काळजी घ्यावी, अशा सूचना आधीच शिवेसनेच्या सर्व खासदारांना केल्या आहेत. पक्षीय पातळीवर त्यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी काय असते पात्रता?
- सर्वप्रथम उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
- उमेदवाराचे वय किमान ३५ वर्षे पूर्ण केलेले असावे.
- तो राज्यसभेच्या सदस्यांसाठी असलेल्या पात्रतेच्या अटी पूर्ण करणारा असावा.
- उपराष्ट्रपती पदावर असताना, उमेदवार कोणतेही लाभाचे पद धारण करू शकत नाही. तो लाभाचे पद धारण करणारा नसावा.












Click it and Unblock the Notifications