काल मुंडे-फडणवीस भेट, आज वाल्मिक कराड शरण; कारमधील सहकाऱ्याने सांगितला त्याचा ठावठिकाणा...
Valmik Karad arrested in Santosh Deshmukh murder case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील खरा सुत्रधार असा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. तर ही शरणागती पत्करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतरच मुंडे यांचे समर्थक मानले जाणारे वाल्मिक कराड यांनी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन केले.
सीआयडी कार्यालयासमोर जमले होते कार्यकर्ते
वाल्मिक कराड हे सीआयडीच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्याठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जमले होते. यानंतर एमएच 23 BG 2231 क्रमांकाच्या पांढऱ्या स्कॉर्पिओ कारमधून वाल्मिक कराड सीआयडीच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत दोन व्यक्ती होत्या. त्यापैकी एका व्यक्तीने वाल्मिक कराड हे सीआयडीच्या कार्यालयात येण्यापूर्वी कुठे होते, याचा ठावठिकाणा संपूर्णपणे सांगितला.

आम्ही आत्ताच स्वामी समर्थांच्या दर्शनावरुन आलोय
वाल्मिक कराड यांच्यासोबत गाडीतून उतरलेल्या या दोघांना प्रसारमाध्यमांनी घेरले. तुम्ही वाल्मिक कराडांसोबत कुठून आलात, कुठे होतात, असा प्रश्न यापैकी एका व्यक्तीला विचारण्यात आला. यावर संबंधित व्यक्तीने म्हटले की, आम्ही आता देवावरुन आलो, आम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरातून इकडे आलो. पण आठ दिवस वाल्मिक कराड कुठे होते, माहिती नाही.
वाल्मिक कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल
वाल्मिक कराड ज्या कारमधून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात दाखल झाले. त्या गाडीत असलेल्या दोघांपैकी एका व्यक्तीला माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेरले. त्यांच्यासोबत विचारणा केली असता. ते म्हणाले की, वाल्मिक कराड मला अक्ककोटच्या मंदिरात भेटले होते. तर या व्यक्तीसोबत असणारा बीडमधील एक नगरसेवक गेल्या तीन दिवसांपासून वाल्मिक कराड यांच्यासोबत आहे. परवापासून वाल्मिक कराड हे पुण्यातच आहेत, असे या नगरसेवकाने सांगितले. वाल्मिक कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भीती वाटत होती, असे या नगरसेवकाने सांगितले.
राजकीय द्वेषापोटी माझे या प्रकरणाशी नाव जोडले
वाल्मिक कराड हे मंगळवारी दुपारी 12 वाजता सीआयडीच्या कार्यालयात आले. तत्पूर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली. मी वाल्मीक कराड असून माझ्यावर केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. सरपंच संतोष भैय्या देशमुख यांचे जे कोणी मारेकरी आहे, त्यांना अटक करावी. त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. केवळ राजकीय द्वेषापोटी या प्रकरणाशी माझे नाव जोडले जात आहे. पोलीस निष्कर्षात मी जर दोषी आढळल्यास न्यायदेवता जे काही शिक्षा देईल ते मी भोगण्यास तयार आहे, असे वाल्मिक कराड यांनी म्हटले.












Click it and Unblock the Notifications