वाल्मिक कराड- सुदर्शन घुलेवर कारागृहात झाला हल्ला? नेमका काय होता 'गेम'; तुरुंग प्रशासन म्हणतंय...
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह आठ आरोपी सध्या बीड कारागृहात आहेत. या कारागृहातच वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला झाल्याच्या बातम्या आज आल्या. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडूनही वाल्मिक कराडला मारहाण झाल्याचा दावा करण्यात आल्यानंतर चर्चा वाढली. या हल्ल्यानंतर तुरुंग प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला. मात्र तुरुंग प्रशासनाने या प्रकाराबाबत वेगळीत माहिती दिली.

तुरुंगात नेमके काय झाले?
आ. सुरेश धस यांनी बीड कारागृहात घडलेल्या घटनेची माहिती आज पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवले असा आरोप बबन गित्ते व महादेव गित्ते यांनी केला. याच रागातून महादेव गित्ते याने वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला कारागृहातच मारले. कारागृहात चांगला राडा झाला, असा दावा आ. सुरेश धस यांनी केला.
प्रशासनाचे म्हणणे काय?
बीड कारागृहाचे पोलिस महासंचालक जालिंदर सुपेकर यांनी या प्रकारावर भाष्य केले. ते म्हणाले की, आज सकाळी महादेव गित्ते व सोनावणे-फड टोळीत फोन करण्याच्या कारणातून वाद झाला. नंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. गित्ते व इतर टोळीत हा वाद झाला. त्यात वाल्मिक कराड किंवा सुदर्शन घुलेचा काही संबंध नाही. अक्षय आठवले गँगचे नावही या हाणामारीत आल्याचे समजते. परंतु पोलिसांनी फक्त किरकोळ वाद झालाय, असे स्पष्टीकरण दिले.
काय आहेत चर्चा?
मकोका कायद्यातंर्गत वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर कारवाई करण्यात आली. ते बीडच्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे. महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांच्याकडून वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, या घटनेबाबत तुरुंग प्रशासने पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचेही समजते. काही कैद्यांना दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात येणार असल्याची माहितीही, बीड कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली. आता या मारहाणीत वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेंना मारहाण झाली अशी चर्चा मात्र बीड जिल्ह्यात रंगली आहे.












Click it and Unblock the Notifications