'धनगरांना आदिवासीत आरक्षण नको', विधानसभा उपाध्यक्ष संतापले, मंत्रालयातील जाळीवर उडी अन्...
Dhangar reservation : एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी असताना धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण दिले जावे, अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने केली जात आहे. त्यातच शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे.
या मागणीला विरोध करत आज शुक्रवारी (दि.4) आदिवासी आमदारांकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी समाजातील आमदारांनी आज मंत्रालयातच आंदोलन केले. यात विशेष बाब म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन जाळीवर उड्या मारल्या. त्यामुळे मंत्रालयात काही काळ गोंधळ उडाला होता.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह त्यांच्या आमदार सहकाऱ्यांनी थेट मंत्रालयातील संरक्षक जाळीवरच उड्या मारल्या. तर काही कागदपत्र त्यांनी फेकून दिले आहेत. मागील 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्याअंतर्गत भरती करा, या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहा दिवसांपासून आम्ही वेळ मागत आहोत मात्र ते देखील आम्हाला भेट देत नाहीत. जर असे होत नसेल तर आम्हाला वेगळा पर्याय निवडावा लागेल, असा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी यांनी दिलाय होता.
#WATCH | NCP leader Ajit Pawar faction MLA and deputy speaker Narhari Jhirwal jumped from the third floor of Maharashtra's Mantralaya and got stuck on the safety net. Police present at the spot. Details awaited pic.twitter.com/nYoN0E8F16
— ANI (@ANI) October 4, 2024
मंत्रालयातील जाळीवर मारल्या उड्या
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यात याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही तुमच्या विषयाबाबत सकारात्मक आहोत, असे आश्वासन झिरवाळ यांना दिले. मात्र कुठलाही निर्णय न झाल्याने आदिवासी आमदारांनी आक्रमक पवित्रा उचलला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामन खोसकर यांच्यासह यांचे सहकाऱ्यांनी थेट मंत्रालयातील जाळीवरच उड्या मारल्या. यानंतर पोलिसांनी त्यांना सुखरूप जाळीबाहेर काढले. त्यानंतर आदिवासी आमदार मंत्रालयात ठिय्या मांडून बसले आहेत.
या भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरले
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. त्या दृष्टीने मंत्रालयात हालचाली सुरु आहेत. अशातच राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यास विरोध केला आहे. दोन दिवसांपूर्वी हे सर्वपक्षिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी अनेक तास वाट पाहूनही मुख्यमंत्र्यांनी या आमदारांची भेट घेतली नव्हती. आज पुन्हा हे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे. तसेच पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे. या भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरले आहे.
पडळकरांनी दिला झिरवाळांना सल्ला
याबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, आज इतक्या मोठ्या पदावर आहेत. सरकारचे जबाबदार प्रतिनिधी आहेत. त्यांनी असे पाऊल उचलण्याची आवश्यकता नाही. जो काही विषय होईल तो मुख्यमंत्री साहेबांच्या चर्चेतून सोडवला जाईल. इतकी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. सरकार आता बऱ्याच घटकांना न्याय देण्याच्या संदर्भात प्रयत्न करत आहेत. पेसासंदर्भात देखील सरकार चांगली भूमिका घेईल. त्यामुळे झिरवाळ साहेबांनी कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये, असे प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.












Click it and Unblock the Notifications