पाय सरकला अन् लोकलखाली आली महिला, जीव वाचला पण…
मुंबई: मुंबईत पडलेल्या पावसाने धांदल उडाली. याचा फटका लोकल सेवेलाही बसला. रुळांवर पाणी साचल्यामुळे मध्य व हार्बर रेल्वे ठप्प झाली. तर पश्चिम रेल्वेही उशिराने धावत आहे.
यामुळे शहरातील चाकरमान्यांची रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी उसळली. ही गर्दी एका महिला प्रवाशाच्या जीवावर बेतली. पाय घसरुन रेल्वेरुळावर महिला पडली. या दुर्घटनेत ती वाचली पण तिला आपले दोन्ही पाय गमावण्याची वेळ आली.

सोमवारी सकाळी सीबीडी रेल्वेस्थानकादरम्यान ही घटना घडली. पनवेलहून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी 9 च्या सुमारास बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकात येत होती. तेव्हा अचानक या महिलेचा पाय घसरला आणि ती रेल्वे रुळावर पडली.
ही घटना अचानक घडल्यामुळे महिला गांगारुन गेली. लोकल अगदी समोरच होती. डोळ्याची पापणी लवत नाही तोपर्यंत महिलेच्या पायावरुन लोकलचा पहिला डबा गेला.
लोकल घेतली मागे
पायावरुन चाक गेल्याने महिलेचा आक्रोश सुरु झाला. ही बाब लक्षात येताच प्रवाशांनी एकच आरडाओरडा केली व मदतीसाठी ते धावले, दरम्यान, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता महिला जीवंत होती. घटनेचे गांभीर्य ओळखत ती लोकल तशीच मागे घेऊन महिलेला बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले असून तिला तिचे दोन्ही पाय तुटल्याचे लक्षात येताच तिने हंबरडा फोडला. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications