कट्टर विरोधकांनी केले एकत्र जेवण; महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भुकंप होणार?
एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात सुमारे अर्धा तास गुप्त बैठक झाली. त्यानंतर या दोघांनीही एकत्र जेवण केले. याच जेवणावळीची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे. एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता गुलाबराव पाटलांसोबत केलेले जेवण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भुकंप घडवणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

नेमकं काय झालं?
आज एकनाथ खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची त्यांच्या अँटी चेंबरमध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, आमदार सुरेश भोळे यांच्यासह इतर नेते मंडळी दाखल झाली. यानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. दरम्यान, गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र, दोघांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांवर टिका
या बैठकीपूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्या बैठकीत एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. २५ पत्र देऊनही आपल्याला कोणत्याच पत्राचे उत्तर दिले गेले नसल्याची खंत खडसे यांनी मांडली. आमदारांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे, असा शासनाचा आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला एकाही बाबतीत उत्तर दिलं नसल्याचं त्यांनी या बैठकीत सांगितलं.
भेटीची चर्चा वाढली
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे यांच्या एकत्र जेवणाची राज्यात चांगलीच चर्चा सुरु आहे. एकनाथ खडसे हे शरद पवारांना सोडणार का, हा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यापूर्वी खडसे हे भाजपात जातील अशा चर्चा होत्या. खडसे यांचीही पुन्हा भाजपात जाण्याची तयारी होती. मात्र त्यावेळी गिरिष महाजन यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला आडकाठी केली असे सांगितले गेले. मात्र आता एकनाथ शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची व खडसे यांची भेट झाल्यामुळे खडसे एकनाथ शिंदे यांच्या पार्टीत येणार का, हा प्रश्न समोर आला आहे.












Click it and Unblock the Notifications