मुन्नी कोण? अजितदादा भडकल्यानंतर सुरेश धसांनी थेट 'हिंट'च दिली; म्हणाले, मुन्नी व तिचा डार्लिंग...
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर या घटनेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज पैठण येथील आक्रोश मोर्चात आ. सुरेश धस यांनी पुन्हा आपल्या आक्रमक शैली वेगवेगळे खुलासे केले. आ. सुरेश धस यांनी आक्रमकपणे भाषण करत मंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक कराडवर निशाणा साधला. आ. धस यांनी आज राष्ट्रवादीतील मुन्नीचा उल्लेख केल्याने चर्चा वाढल्या. त्यानंतर पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धसांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

धस नेमकं काय म्हणाले?
पैठण येथील आक्रोश मोर्चात सुरेश धस यांनी मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत, असे विधान केले. त्यानंतर सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी नेमकी कोण, असा प्रश्न चर्चेत आला. याच प्रश्नावर पत्रकारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात थेट अजित पवारांना मुन्नीबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवारांनीही धस यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सुरेश धसांनी आता मुन्नी नेमकी कोण, याबाबत स्वतः खुलासा केला आहे.
मुन्नी नेमकी कोण?
मुन्नीबाबत बोलताना आ. सुरेश धस म्हणाले, "मुन्नी ही महिला भगिनी वगैरे कुणी नाही. राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. मी कुणाबद्दल बोललो आहे, हे ते त्या मुन्नीला १०० टक्के कळालेलं आहे. फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नी बदनाम अगोदरच झालेली आहे. मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिये... ही जी डार्लिंग आहे ना त्या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत", असं म्हणत आ. सुरेश धस यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली.
पवार-हाकेबाबतही बोलले
आ. सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट का आणि कशासाठी घेतली, याबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, "अजित पवार आणि माझे वेगळे संबंध आहेत. पतसंस्थांच्या घोटाळ्याबाबत प्रश्न घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. राजस्थानी मल्टीस्टेट बँकेचे प्रकरण आकाने आणि आकाच्या आकाने केलेला आहे. हे मी त्यांना सांगितले." हाकेंबाबतही धस बोलले. ते म्हणाले, "मला लक्ष्मण हाकेंवर काहीही बोलायचे नाहीत. दिशा भरकटवण्याचा हा प्रकार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय डायव्हर्ट करण्याचा लक्ष्मण हाके यांचा प्रयत्न आहे, अशा शब्दात धस यांनी हाकेंवर टीका केली.












Click it and Unblock the Notifications