कल्याण राड्याची आतली बाजू : पोलिस अधिक्षकांनी सांगितली A टू Z माहिती
कल्याण येथील मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीचा मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला आता पोलिसांच्या ताब्यात आहे. अखिलेशने आत्मसमर्पण केले नाही, तर त्याला आम्ही पकडल्याची माहिती पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली. या प्रकरणातील काही आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे प्रकरणाची ए टू झेड माहिती पोलिस अधिक्षकांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.

अखिलेश पोलिसांच्या ताब्यात
पोलिस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले की, "खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपीने तासाभरापूर्वी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओची आम्ही पडताळणी करत आहोत. सदर आरोपी हा टिटवाळा आणि शहाड परिसरात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार त्याला तिथून ताब्यात घेण्यात आलं आहे. आता आरोपीचं मेडिकल करुन त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे."
गुन्हातील कलमही वाढणार
झेंडे म्हणाले, "इतर आरोपींना अटक करण्याबाबतही आमच्या टीमचं काम सुरु आहे. उरलेले आरोपी आणि त्यांच्या साथीदारांना आम्ही लवकरात लवकर अटक करु. या प्रकरणात एकूण आठ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. अटकेची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर त्याला न्यायालयात नेण्याची प्रक्रिया केली जाईल. जखमी अभिजित देशमुख यांचा जबाब नोंदवला जात आहे. त्याचप्रमाणे आम्ही मेडिकल सर्टिफिकेट प्राप्त करत आहोत. दोन्ही जबाब नोंदवल्यानंतर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत. जखमींचा जबाब आणि डॉक्टरांचं ओपिनियन जाणून घेऊन आम्ही या प्रकरणात कोणकोणती कायदेशीर कलमे वाढवायची याबाबत निर्णय घेणार आहोत."
हल्ला करणारे आरोपी सराईत?
पोलिस अधिक्षक अतुल झेंडे म्हणाले, "सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे टोळके हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का, ते अद्याप समजू शकलेलं नाही. आम्ही त्यांची चौकशी करत आहोत. आरोपींचा पूर्व इतिहास घेण्याबाबतची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला वगळता इतर दोन आरोपींवर एमएसपी पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचे जुने गुन्हे आणि आताचा गुन्हा या अनुषंगाने आम्ही कडक कारवाई करत आहोत. शुक्ला यांचा रेकॉर्ड आम्ही चेक करत आहोत."












Click it and Unblock the Notifications