सत्तेचा संघर्ष की कौटुंबिक समेट? सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वासमोर काय आहेत आव्हाने? वाचा 6 मुद्द्यात
Sunetra pawar ncp president challenges : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांच्या निधनानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे. पक्षाच्या अध्यक्षा म्हणून त्यांच्यासमोर केवळ पक्ष टिकवण्याचेच नव्हे, तर तो वाढवण्याचेही मोठे आव्हान आहे.

१. नेतृत्वाची स्वीकारार्हता आणि आक्रमकता
अजित पवार यांची ओळख एक 'डॅशिंग' आणि प्रशासनावर पकड असलेला नेता अशी होती. सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंत पडद्यामागून काम केले आहे. कार्यकर्त्यांना आणि आमदारांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी लागणारी राजकीय आक्रमकता सिद्ध करणे हे त्यांच्यापुढील पहिले मोठे आव्हान असेल.
२. आमदारांची निष्ठा
सत्तेच्या समीकरणात अजित दादांसोबत आलेले आमदार सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली किती काळ एकनिष्ठ राहतील, हा कळीचा मुद्दा आहे. पक्षांतर्गत बंडाळी रोखणे आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) या मित्रपक्षांसोबत जागावाटपात आपला वाटा पदरात पाडून घेणे, हे त्यांच्यासाठी मोठे कसोटीचे काम असेल.
३. प्रशासकीय पकड
दादांकडे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठे प्रभुत्व होते. सुनेत्रा पवारांना प्रशासनातील सूक्ष्म बारकावे समजून घेण्यास आणि सरकारी यंत्रणेवर वचक निर्माण करण्यास वेळ लागेल, ज्याचा परिणाम पक्षाच्या राजकीय प्रतिमेवर होऊ शकतो.
४. राष्ट्रवादीची पुढची वाटचाल: सुनेत्रा पवार आणि शरद पवार
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल प्रामुख्याने "सावध पवित्रा" घेण्याची असेल. सद्यस्थितीत पक्षासमोर दोन मुख्य पर्याय उरतात.
५. शरद पवारांशी जुळवून घेणे
अजित दादांनंतर आता सुनेत्रा पवार कौटुंबिक आणि राजकीयदृष्ट्या शरद पवार यांच्याशी जुळवून घेतील का? जर सुनेत्रा पवारांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चालवण्याचा निर्णय घेतला, तर दोन्ही गट पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता बळावेल.
६. पुन्हा 'एकत्रित' राष्ट्रवादी?
राजकीय विश्लेषकांच्या मते, अजित दादांच्या निधनानंतर आता संघर्षाचे मुख्य कारण उरलेले नाही. दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र आले, तर राज्यात पुन्हा एकदा "पवार पॉवर" जोमाने निर्माण होऊ शकते. सुनेत्रा पवार यांनी याआधी नेहमीच समलोटाची भूमिका मांडली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून पुढाकार घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.












Click it and Unblock the Notifications