शरद पवार-अजित पवार एकत्र येणार?, NCPच्या बड्या नेत्याचा दावा, सुनंदा पवारांनीही दिले संकेत
Ajit Pawar-Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस गुरुवारी वाढदिवस होता. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीनंतर पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यावर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असे संकेत देखील मिळू लागले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी देखील दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे अशी आशा व्यक्त केली. तर राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी देखील दोन्ही नेते एकत्र येणार असे संकेत दिले आहेत.
नेमकं काय म्हणाले अंकुश काकडे?
अजितदादांनी गुरुवारी पवार साहेबांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ही चांगली बाब आहे. पण त्याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा लावला गेला. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. कार्यकर्ते आणि काही प्रमुखांची इच्छा आहे, दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे. तसेच झाल्यास आनंदाची गोष्ट असेल, असे शरद पवार गटाचे प्रवक्तेअंकुश काकडे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, पण याचा अंतिम निर्णय पवार साहेब घेतील. पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील अडचण राहणार नाही. पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्याला कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी विरोध करेल असं वाटत नाही.

यावेळी बोलताना अंकुश काकडे यांनी अजित पवार गटाचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. अमोल मिटकरी यांना अकोल्यात कोण ओळखतं? पवार साहेब आणि अजितदादा यांनी एकत्र यावं अशी इच्छा राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेत्यांची पदाधिकाऱ्यांची आहे. जर पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले तर अमोल मिटकरी आणि रूपाली पाटील यांची कुचंबना होणार आहे. चक्की पीसिंग म्हणणारे आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अजित दादांना आपल्या सोबत घेतात. एकमेकांवर केलेल्या टीकेला आज महत्त्व राहिलं नाही. काल केलेली टीका उद्या स्तुतिसुमने होऊ शकतात, असा टोला यावेळी काकडे यांनी लगावला आहे.
सुनंदा पवार यांनी देखील दिले संकेत
मूठ घट्ट असली की ताकद रहाते, आपण जर विखुरलेले राहू तर ताकद राहणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले पाहिजे. कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केले आहे. सुनंदा पवार पुढे बोलताना म्हणाल्या की, अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याबद्दल निर्णय घ्यायला हवा. नवे उमदे जे आमदार निवडून आले आहे, त्यांना जर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर पक्ष लवकर उभारू शकतो.
भेट राजकीय नव्हे कौटुंबिक
सुनंदा पवार म्हणाल्या की, अजित पवारांनी काल जी शरद पवार यांची भेट दिली ती राजकीय नाही तर कौटुंबिक होती. हा केवळ कौटुंबिक प्रसंग आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने ही भेट झाली ते नेहमीच होते, असे मला वाटते. ते केवळ शुभेच्छा देत आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आले होते.
भविष्यात एकत्र येतील
सुनंदा पवार म्हणाल्या की, अजितदादा काही बोलले कुणाला भेटले, कुठे गेले तर त्यांची बातमी होते. पण मला त्या भेटीत बातमी सारखे काही वाटत नाही. कुटुंबामध्ये मतभेद असतात, सर्वच कुटुंबामध्ये मतभेद असतात. मतभेद संपवून पुढे एकत्र येतील असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे. शरद पवार यांनी 60 वर्षे राजकारण केले आहे. त्यांनी काय करावे यावर मी बोलू शकणार नाही.












Click it and Unblock the Notifications